Last Updated on 10 Mar 2022 10:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
आम्ही देशी गाईच्या शेणापासून धूप बनवीत असून तो जगाच्या पाठीवर ४० देशात विक्री करीत आहोत. महिलांनी देशी उद्योगाचा ब्रँड बनवून विक्री कौशल्य आत्मसात करावे,असा विश्वास अंबप (कोल्हापूर) येथील पारखी ऍग्रोटेकच्या अध्यक्षा सौ.मोनिका मोहिते यांनी राजाराम नगर येथील महिला कार्यशाळेत बोलताना व्यक्त केला.
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांना देशी कुक्कुटपालन व अंडी विक्री व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्या साठी मोफत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वर्गाचे आयोजन केले होते. राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीने या वर्गाचे संयोजन केले. प्रा.शामराव पाटील,महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने,संचालिका सौ.मेघा पाटील, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीजचे व्हाईस प्रेसिटेंड सुभाषराव जमदाडे,पशुधन विकास अधिकारी डॉ.सचिन वंजारी,जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे,पोल्ट्री व्यवस्थापक सुधाकर माने,अवधूत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
सौ.मोहिते म्हणाल्या,आम्ही सेंद्रीय शेती करीत आहोत. आम्ही कावेरी जातीच्या देशी कोंबड्या पाळल्या असून त्यांचे अंडे २१ रुपयांना मुंबईमध्ये विकत आहोत. युवा नेते प्रतिकदादा पाटील यांचा ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
प्रारंभी सुभाषराव जमदाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले,प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही मुक्त संचार देशी कुक्कुटपालन हा उपक्रम राबवित आहोत. तालुक्यातील महिलांना आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनविणे,त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आम्ही महिलांना २१ दिवसाची देशी पिल्ले देवून खाद्य व व्यवस्थापन मार्गदर्शन
करणार आहोत. तसेच जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून अर्थ साहाय्यही करणार आहोत. आझोला नावाची पान वनस्पती आपल्या जागेत लावून तिचा पोल्ट्री खाद्यात वापर केल्यास ३० ते ३५ टक्के खाद्याच्या खर्चात बचत होवू शकते.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,राज्याचे जल संपदामंत्री ना.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात राजारामबापू उद्योग समूहाच्या वतीने तालुक्यातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार आहोत.
सौ.सुनीता देशमाने म्हणाले,ना.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खालील योजना,उपक्रम तालुक्यातील जास्तीत-जास्त महिलांच्यापर्यंत पोचवू.
डॉ.सचिन वंजारी यांनी देशी कुक्कुटपालन,त्याचे लसीकरण व घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. इलियास पिरजादे यांनी अभियानच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्या साठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सुधाकर माने यांनीही मनोगत व्यक्त केले. अवधूत पाटील यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.










































































