Last Updated on 19 Nov 2021 8:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल जे भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दिसेल. तज्ज्ञांच्या मते, ५८० वर्षांनंतर असे घडेल जेव्हा एवढ्या मोठं आंशिक चंद्रग्रहण दिसेल. याआधी १८ फेब्रुवारी १४४० रोजी इतके मोठे चंद्रग्रहण झाले होते.
हे ग्रहण भारताच्या ईशान्य भागात दिसणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागात हे दिसून येईल. याशिवाय उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात हे दिसून येईल.
चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३४ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५.३३ वाजता संपेल. खंडग्रास ग्रहणाचा एकूण कालावधी ०३ तास २६ मिनिटांचा असेल. पेनम्ब्रल (उपच्छाया) चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ०५ तास ५९ मिनिटे असेल.
हे ग्रहण कार्तिक पूर्णिमेला लागणार आहे.भारतात ग्रहणांचा परिणाम राशींवर होत असतो अशी मान्यता आहे.काय असेल खास? 19 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातली पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आहे.ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या काळात अनेक गोष्टी करणं वर्ज्य मानले जाते. तसेच,ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक चंद्रग्रहण केव्हा लागतं यानुसार त्याचा काही राशींवर वाईट तर काही राशींवर चांगला प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. या वेळचे चंद्रग्रहण प्रभाव वृषभ रास आणि कृत्तिका नक्षत्रात होणार आहे.









































































