Last Updated on 24 Nov 2021 11:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धकाधकीची जीवनशैलीमुळे झोप न येणे फार मोठी समस्या झाली आहे. कामाचा व्याप वाढत असल्याने शहरातील लोकांची झोप उडाली आहे. शहरी जीवनशैली जगणारे कित्येक तरुणांना याची तक्रार आहे. तज्ज्ञांप्रमाणे या धावत्या जीवनशैलीतही तुम्ही चांगली आणि शांत झोप घेऊ शकता. पण त्याआधी आपल्या झोपण्याचे ठिकाण आरामदायक आहे याची खात्री पटवून घ्यायला हवी आणि चांगल्या झोपेसाठी काय करता येईल ते खालील प्रमाणे…
आरोग्याला व्यायामाची जोड हवी
योग्य आणि पूरक असा व्यायाम केल्यास झोप लागण्यास मदत होईल. ताण हलका होण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी व्यायाम करणं कटाक्षाने टाळावे.
विश्रांतीही आवश्यक
झोपण्यापूर्वी प्राणायाम करावे. झोपण्याच्या एक तास आधी इंटरनेटच्या संपर्कात जाऊ नये. तसंच ताण देणाऱ्या गोष्टी किंवा काम करणेही टाळाव्या.
निद्रानाशाची मुख्य कारणे
नोकरीच्या ठिकाणचा ताण असणे
लहान मुले
आजूबाजूला सतत गोंगाट
घोरण्याचा आवाज
शारीरिक त्रास
इंटरनेटचा अतिवापर
खूप जास्त खाने
आहारही योग्य असावा
पोटभरून जेवण्यापेक्षा एक घास कमीच खावा, असे म्हणतात ते खरंच आहे. तसंच रात्री काहीच न खाणं, ही सवयदेखील टाळावी. कारण भूकेमुळे झोप लागण्यास अडथळे येऊ शकतात.शिवाय झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा पिणंच टाळावे. त्याशिवाय केक, चॉकलेटसारखे गोडपदार्थही खाऊ नयेत.पलंगावर झोपण्याशिवाय इतर कोणतंच काम करू नका. लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही उपकरणाला तुमच्या बेडरूममध्ये जागा देऊ नका.
झोप येण्यास लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यासोबतच आहारतही बदल महत्त्वाचा

रात्री भाताचे सेवन करा
भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे भात लवकरच पचतो. त्यामुळे लवकर झोप येते.
सलाड खाणे
रात्रीच्या आहारासोबत सलाड खाल्ल्याने लॅक्टोकेरियम स्रवते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.
काय करा?
संशोधक आणि तज्ज्ञ मंडळीनुसार, दिवसातून किमान सात ते नऊ तास झोप घेणं आवश्यक आहे. तुम्ही किती झोपता यावर तुमची चयापचयाची क्रिया अवलंबून असते. खोलीचे रंग हे नेहमी फिके असावेत. जेणेकरून लवकर झोप लागण्यास मदत होईल. तसंच कोणत्याही विचित्र आकाराचे पेंटिग्स किंवा चित्र तुमच्या खोलीमध्ये नसावे. झोपण्याच्या वेळी शक्यतो खिडक्या उघड्या असाव्यात. ताजी हवा झोप लागण्यासाठी फायदेशीर असते. तसंच डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नका. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतील. झोपताना खोलीत पूर्णपणे अंधार आणि शक्यतो हवा खेळती असावी.














































































