Last Updated on 16 Apr 2025 9:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
उन्हाळा सुरू होताच गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी एक विचित्र आणि अस्वस्थ करणारा अनुभव येतो . घराच्या पत्र्यांमधून अचानक येणारे आवाज! हे आवाज “ठक”, “टक टक”, “धप” असे असतात, आणि रात्रीच्या शांततेत हे अधिक तीव्र वाटतात. यामुळे काहींना भीती वाटते, तर काहींना हे कोणत्या आधिभौतिक कारणामुळे होतंय असंही वाटतं. मात्र यामागे आहे अगदी साधं आणि शास्त्रीय कारण.
दिवसभर तीव्र ऊन पडल्यामुळे घरावरील पत्रा तापतो आणि त्याचा आकार थोडा वाढतो. मात्र सूर्यास्तानंतर तापमान झपाट्याने कमी होतं. यामुळे पत्रा थंड होऊन आकुंचन पावतो. या आकुंचनाच्या प्रक्रियेत पत्र्याच्या जोडांमध्ये ताण निर्माण होतो आणि त्यामुळे अचानक धक्का बसल्यासारखा आवाज होतो. दिवसभर प्रखर उन्हामुळे पत्रा गरम होतो. धातूचं नैसर्गिक गुणधर्म असतो की गरम झाल्यावर त्याचा आकार थोडा वाढतो. यालाच ‘थर्मल एक्स्पान्शन’ म्हणजेच ऊष्मीय प्रसरण असं म्हणतात.
रात्र होताच बाहेरचं तापमान झपाट्याने घसरतं. थंड होताच पत्रा पुन्हा आकुंचन पावतो, ज्याला ‘थर्मल कं्ट्रॅक्शन’ (ऊष्मीय आकुंचन) म्हणतात. या आकुंचनाच्या प्रक्रियेमुळे पत्र्यात अचानक हलचाल होते, आणि त्यातून आवाज निर्माण होतो.
आवाज अधिक तीव्र का वाटतो?
रात्रीचा शांत परिसर : दिवसा गोंगाटामुळे लक्षात न येणारा हा आवाज रात्री फार मोठा वाटतो.
मोठ्या पत्र्याचे घर : ज्या घरांमध्ये लांबचौडे पत्रे वापरले आहेत, तिथे हा आवाज अधिक होण्याची शक्यता असते.
सैल बसवलेले पत्रे : जर पत्रे नीट क्लॅम्प किंवा स्क्रूने घट्ट बसवलेले नसतील, तर थर्मल कं्ट्रॅक्शनमुळे अधिक कंपन होतो आणि आवाज वाढतो.
काय धोका आहे का?
नाही. हा पूर्णपणे नैसर्गिक आणि सामान्य प्रकार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या प्रक्रियेमुळे घराला कोणताही तात्काळ धोका नसतो. मात्र, जर आवाज अतिशय मोठा असेल किंवा वारंवार होत असेल, तर पत्रे तपासून घेतलेले उत्तम. विशेषतः जुने पत्रे, गंजलेले भाग किंवा हललेले क्लॅम्प्स हे आवाज वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
काय करता येईल?
शक्य असल्यास घराच्या पत्र्यांवर उष्मारोधक थर (Insulation) द्यावा. यामुळे तापमानाचा परिणाम कमी होतो.
पत्र्यांचे फिटिंग वेळोवेळी तपासावे, सैल भाग घट्ट करावेत.
नवीन घर उभारताना उच्च दर्जाचे आणि थर्मल-फ्रेंडली पत्रे निवडावेत.
उन्हाळ्यात रात्री येणारे घराच्या पत्र्याचे आवाज हे कोणताही आधिभौतिक किंवा संकटदर्शक संकेत नाहीत. ते एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा आवाजांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तरीदेखील सुरक्षिततेसाठी पत्र्यांची नियमित तपासणी आणि देखभाल ही आवश्यक आहे.












































































