Last Updated on 26 Jan 2025 1:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा , अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यापूर्वी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भूषण गगराणी यांनी अभिवादन केलं. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या परिसरात ध्वजवंदन केलं. तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी महालक्ष्मी क्रीडा मैदानावर आयोजित समारंभात तिरंगा फडकावत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तर मुंबईत वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी तिरंगा फडकवला. मुंबई दूरदर्शन केंद्रामध्येही ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी मुंबई दूरदर्शनेचे उपमहासंचालक विश्वनाथ कामलियाल, हंगामी कार्यक्रम प्रमुख सिद्धार्थ भूषण आणि निरंजन पाठक , प्रशासकीय विभाग प्रमुख भाऊसाहेब पगारे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक यांनी आरसीएफ च्या क्रीडा संकुलात ध्वजवंदन केलं.













































































