Last Updated on 09 Jun 2023 7:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जून व जुलै 2023 मधील प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,सांगली कार्यालयामध्ये सुनावणी कक्षामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘त्रुटी पुर्तता विशेष मोहिम’ चे आयोजन करण्यात आलेले आहे.
संबंधित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांनी तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 अंतर्गत मागासवर्गीयांच्या आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या शिबिरात उपस्थित राहून त्रुटी पुर्ण कराव्यात.त्रुटी पुर्तता करण्याकरिता मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांनी केले आहे.
जात पडताळणी अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 12 वी विज्ञान शाखेतील तसेच सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 अंतर्गत जात पडताळणी करिता अर्ज सादर केलेला आहे,परंतु त्यांचे प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत व अशा अर्जदारांना त्रुटीची पुर्तता करण्याबाबत समितीस्तरावरुन ईमेलद्वारे याआधी कळविण्यात आलेले आहे,अशा अर्जदारांकरिता त्रुटी पुर्तता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.







































































