Last Updated on 29 Dec 2024 1:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ‘२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चं १० ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन महाराष्ट्रातल्या चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे इथं दाखवले जातील.
कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ ला आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित केला जात आहे. २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचं प्रदर्शन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसंच राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर सुरु झाली आहे. प्रतिनिधी शुल्क रु.१०००/- असून फिल्म सोसायटी आणि विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क रु. ७५०/- असणार आहे. थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीत आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरिया मधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.
आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवीनचंद्र दिग्दर्शित ‘झंझारपुर’, प्रबल खुंद दिग्दर्शित ‘पाई तंग’, जदुमनी दत्ता दिग्दर्शित ‘जुईफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे. मराठी स्पर्धा विभागात आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.
आशा (दिग्दर्शक दीपक पाटील), सिनेमॅन (दिग्दर्शक उमेश बगाडे), कर्मयोगी आबासाहेब (दिग्दर्शक अल्ताफ शेख ), जिप्सी (दिग्दर्शक शशी खंदारे), भेरा (दिग्दर्शक श्रीकांत भिडे), मॅजिक (दिग्दर्शक रवी करमरकर), मंडळ आभारी आहे (दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक), छबिला (दिग्दर्शक अनिल भालेराव) यांचा या स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचं आयोजन करण्यात येणार आहे.
Courtesy : Prasar Bharati










































































