Last Updated on 10 Apr 2022 9:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
पालकांनी एक जबाबदारी म्हणून आपली मुले घडवली पाहिजेत. त्यांना कष्ट म्हणजे काय असते ते सांगा. त्यांना कष्ट करू दया तरच ते घडतील. कष्ट केले तरच या जगात आपण टिकून राहू. कष्टाचे निरंतर टिकते. सध्याच्या पालकांनी मुलांना आळशी करून ठेवले आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आंतरराष्ट्रीय प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.
गोटखिंडी येथील साद माणुसकीची सेवाभावी संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबोधन व्याख्यानसत्रात असा मी घडलो या विषयावर ते बोलत होते. यावेळी सुरवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. लहाने म्हणाले,शिक्षण ही आयुष्यातील संधी असते. शिक्षणाने माणूस घडतो. योग्य वयातच व वेळेतच शिक्षण घ्यावे लागते. शिक्षणाने माणूस प्रचंड मोठा होतो. तारुण्य आयुष्याची शिदोरी करण्यासाठी असते. त्याचा वापर हा स्वतःला घडवण्यासाठी करायचा असतो. जगात खूप चांगली लोक आहेत फक्त आपण ही चांगले होणे आवश्यक आहे. आई वडील यांना कधी विसरू नका त्यांची ताकत बना त्यांच्यासोबत आनंदी जगा. याहून मोठे जगात कोणतेच सुख नाही. मुलांचं आई वडिलांसोबत भावनिक नात असायला हवं ज्यांचं आहे ती मुलं कधीच वाया जात नाहीत. या जगात सगळ्या गोष्टी मिळतील पण आई वडील मिळत नाहीत. जो पर्यंत ते आहेत तो पर्यंत त्यांच्या सोबत भरपूर आनंदी जीवन जगा. देशातील सर्व वृध्दा आश्रम एकवेळ बंद झाले पाहिजेत. मुलांनी असे आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नये अशा मुलांना गोळ्या घालून मारले पाहिजे. घरात स्वर्ग तयार करा. घरच्या लोकां सोबत आनंदी रहा. कितीही मोठे झालात तर पाय नेहमी जमिनीवर ठेवून काम करा यातच खरा आनंद आहे. दुभंगलेले ओठ व टाळू यावरील ९ हजार ऑपरेशन मोफत केली आहेत. तर आता पर्यंत ६८ हजार ऑपरेशन यशस्वीपणे केली आहेत. १७ वर्षांपासून हे काम करत आहेत.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक धनंजय थोरात, बाळासाहेब तिबिले यांनी तर आभार हैबत माळी यांनी मानले.









































































