Last Updated on 31 Oct 2023 6:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी बावची,गोटखिंडी,पडवळवाडी येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना ऊस वाहतूक टॅक्टर थांबवून ट्रॅक्टरच्या हवा सोडली.तर हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या गट ऑफिसला टाळे ठोकले.त्यामुळे उसदराचा प्रश्न आगामी काळात पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) आष्टा बावची,पडवळवाडी,गोटखिंडी या परिसरातील आठ ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडल्या.काही ठिकाणी चालू असलेल्या ऊस तोडी बंद पाडल्या.यावेळी ऊस उत्पादक शेतकरी तसेच वाहतूकदार यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले,यावर्षी साखरेचा सरासरी भाव ३८५० रूपये पर्यंत राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झाला असून यावर्षी ऊस कमी आहे.तरी शेतकऱ्यांनी थोडा दिवस ऊसतोड बंद ठेवाव्यात.त्यामुळे उसाची कांडी सोन्याची कांडी असून तिला भंगारच्या भावामध्ये विकू नका.बाजारपेठेतील भावाचा साखरेचा फायदा तसेच उपपदार्थांचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे.त्यासाठी हे आंदोलन चालू असून शेतकऱ्यांनी थोडा धीर धरला तर निश्चितच साडेचार ते पाच हजार उसाला भाव मिळू शकतो.
यावेळी भागवत जाधव संदीप राजोबा युवा आघाडीचे संजय बेले,बाबासाहेब सांद्रे,जगन्नाथ भोसले,प्रताप पाटील,प्रभाकर पाटील,प्रकाश माळी,शितल सांदरे नितीन पंडित,विलास यादव,शामराव जाधव,प्रवीण कोल्हे,गिरीश पाटील,भरत साजने,दीपक मगदूम,सागर वळवडे,मनोज सरडेरोहित साळुंखे,प्रविण पाटील,सुनील कुदळेव मोठ्या प्रमाणतव ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान,ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.त्यामुळे ऊसदर आंदोलन तीव्र होत आहे.अनेक भागातील शेतकऱ्यांनी ऊसदराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या आहेत.तर काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखली जाते आहे.एकूणच उसदराचा प्रश्न आगामी काळात पेटणार असल्याचे दिसून येत आहे.












































































