Last Updated on 06 Oct 2024 8:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उसाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी
जयसिंगपूर । गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनाला यश आल्यामुळे आता कारखानदार पैसे देत आहेत, मात्र त्यांची संख्या कमी आहे. त्याबरोबरच गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रुपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डन सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णाप्पा पांदारे होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चालू वर्षाच्या गळीत हंगामातील २३ वी ऊस परिषद २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे.
शेट्टी म्हणाले, येथून पुढे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, असंघटित कामगार, ऊस वाहतूकदार, महावितरणचे कंत्राटी कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी डाटा एन्ट्री करणारे कर्मचारी तसेच सर्व कर्जदारांसाठी इथून पुढे आंदोलने उभारणार आहे.यावर्षी सरासरी ३ हजार ५५८ रुपये साखरेला भाव मिळाला आहे. त्यामुळे आणखी २०० ते ३०० रुपये मागील उसाला कारखानदार देणे लागतात आणि ते वसूल केल्याशिवाय राहणार नाही.
राज्याला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. त्यासाठीच परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून येत्या विधानसभेला दहा ते बारा आमदार स्वाभिमानीचे असतील, असे राजू शेट्टी यानी सांगितले.
प्रा. जालंदर पाटील म्हणाले, चळवळीतील ताकत व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकते. यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील.
लोकसभेला ज्यांनी ज्यांनी स्वाभिमानीला दमवले त्यांना येणाऱ्या विधानसभेत चांगलाच धडा स्वाभिमानीचे कार्यकर्ते शिकवतील, असा इशारा सावकार मादनाईक यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, राजेंद्र गड्डुचाणवार, पुरंदर पाटील, भागवत जाधव, जर्नादन पाटील, सचिन शिंदे, अजित पवार, विठ्ठल मोरे, धनाजी पाटील, जयकुमार कोले, राजगोंडा पाटील, सुभाष शेट्टी, भीमगोंड बोरगावे, रामचंद्र शिंदे यांची भाषणे झाली. विक्रम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मिलिंद साखरपे यांनी केले.












































































