Last Updated on 06 Mar 2022 10:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतिवीर पांडू मास्तर यांचे वारसदार श्रीमती बनुबाई भगवान पाटील यांचा मराठमोळा युवक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुरेंद्र पाटील,राकेश पाटील,उद्योजक अभिजीत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील,अक्षय पाटील,सागर पाटील,बी.आर.पाटील,जालिंदर नांगरे,संग्राम पाटील,विनायक पाटील आदी उपस्थित होते.
क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा
पांडुरंग गोविंद पाटील तथा पांडू मास्तर यांचा जन्म येडेनिपाणी गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता.सामान्य परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षण घेतले.1925 साली ते शिक्षक म्हणून नोकरीस लागले.पण त्यांचे बंडखोर मन नोकरीत रमलेच नाही.त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.अगदी निर्भयपणे तीस-पस्तीस वर्षे भूमिगत राहून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले सेनापती बापट,नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळाले.मल्लिकार्जुन डोंगरावर कार्यकर्त्यांच्यासह आपल्या स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरवत असत.10 सप्टेंबर 1942 साली त्यांनी इस्लामपूर कचेरीवर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता.1942 साली त्यांना पहिल्यांदा तुरूंगवास झाला होता पण येरवड्यातील भिंती त्यांना रोखू शकल्या नाहीत. तुरुंग फोडून त्यांनी पलायन केले व भूमिगत राहून स्वातंत्र्याचा अग्निकुंड धगधगत ठेवला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसनवीर,वसंतदादा पाटील, काशिनाथ देशमुख,देशभक्त बर्डे गुरुजी यांच्या समवेत दूरध्वनी रेल्वे पोस्ट ऑफिस विस्कळीत करून ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रखर लढा दिला.हरताळ,सायंफेरी, भाषणे,कीर्तने,पोवाडे इत्यादी माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचे प्रयत्न केले.अशा या महान क्रांतिविरास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्रिवार अभिवादन…!








































































