Last Updated on 09 Feb 2022 5:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लता तू गात होतीस आणि एक नवीन चांदणं जन्म घेत होतं. या पन्नास-साठ वर्षाच्या काळात आकाश कसं चांदण्यांनी गच्च भरून न्हाऊन टाकलसं असं चांदणं शिंपीत राहणारी तू गेलीस कुठं? बोलवलं की काय त्या श्रीहरीने तुला, त्याच्या बासरीसोबत गायला. आज सकाळी सूर्याचे दर्शन घेताना जाणवलं खरं, सूर्य काळवंडलेलाच,पण म्हणलं ढग आलेत म्हणून असेल पण तसं नाही,नंतर कळालं सप्तसूर शांत झाल्याचं.लता तू स्वरसम्राज्ञी होतीस,गानसम्राज्ञी होतीस,गानकोकिळा होतीस. भारतरत्न ही तुला मिळालं होतं हे सगळं तुला माहीत होतं तरी तुझी ओळख एक माणूस म्हणून तुला जास्त महत्वाची वाटत होती.
खूप प्रेम केलं लता तुझ्यावर आम्ही.आज तुझ्या 93 व्या वर्षी तुम्हाला न म्हणता तुला म्हणण्यात काय वाटतं माझं मलाच माहित.परमेश्वराला कधी आपण अहो-जाहो करतो काय? तो अगदी सर्वार्थानं आपलाच असल्यासारखा वाटतो तसेच लता तू आमच्यासाठी होतीस. आज होतीस असंही म्हणताना काय यातना होतात म्हणून सांगू. आज टीव्हीसमोर दिवसभर बसले असता सगळेजण तुझ्याविषयी भरभरून बोलत होते पण त्या सगळ्या गोष्टी सांगताना तू त्यांच्याबद्दल काय म्हणालीस हेच आवर्जून सांगत होते त्यांच्या दृष्टीने तो पुरस्कारच होता त्यांच्यासाठी. खरं सांगू लता तुझ्या दोन अक्षरांची जादू इतकी विलक्षण आहे की आता परमेश्वरानी असाच जादूचा प्रयोग पुन्हा करायचं ठरवलं तर त्याला सुद्धा जमणार नाही बरं का !
गाण्यांच्या प्रचंड पसरलेल्या साम्राज्यात तू अनभिषिक्त सम्राज्ञी होतीस. सज्जाद, मदनमोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खळेकाका, तुझे स्वतःचे बंधू हृदयनाथ जी….किती नाव घ्यायची !! शांताबाई, प्रवीण दवणे, पी सावळाराम, राजा मेहदी अलीखॉं, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, इंदिवर…खूप नावं समोर येतात या सगळ्यांच्या स्वरांचं,शब्दांच तू सोनं केलंस.तुझ्या श्वासातून येणारा स्वर सगळ्यांना आनंद देत होता.तू आनंदघन होतीस.तू केवळ गाणंच म्हणत नव्हतीस,तर ते गाणं कोणत्या गीतकाराचं,त्याचे शब्द काय,त्याचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे,गाणं कुणावर चित्रित झालं,त्या वेळची परिस्थिती काय. तू सगळं समजावून घ्यायची आणि मग तुझ्या कंठातून ते कमालीचे अप्रतिम स्वर बाहेर पडत.मला वाटतं त्या वेळी तुझी तू राहातच नव्हतीस की काय?परकाया प्रवेश करून हे सगळं करत होतीस का? त्यामुळे आम्ही जेव्हा ऐकत असू तेव्हा स्वरांचा एक आगळा वेगळा आविष्कार,गोड स्वर, सुंदर स्वर,आवाजाचा दैवी चमत्कार आम्ही अनुभवत होतो.लता तुला विचारायचं राहूनच गेलं,तीन चार मिनिटाच गाणं,संगीतकाराने कष्ट घेऊन तयार केलेली अवघड सुरावट किंबहुना दुसऱ्या कुणाला गाता येऊ नये कि काय इतक्या प्रयत्नपूर्वक तयार केलेल गाणं.संगीतकाराने त्यात आपले प्राण अक्षरशः ओतून केलेल.अशा अवघड सुरावटीच्या गाण्यात तू श्वास केव्हा घेत होतीस गं? तुझा श्वास ऐकण्याचा खूप प्रयत्न केला पण तो कधीच ऐकू आला नाही.आम्हाला आनंद देण्यासाठी तू हे सगळ करत होतीस का?
दीदी तुम्ही किती किती मोठ्या ! खूप खूप मोठ्या !! मी विसरून गेले की काय.तुमचं जाणंच आम्हाला सहन झालं नाही.दीदी तुम्हाला एकेरी संबोधत तुमच्या जवळ येण्याचा तो एक प्रामाणिक व वेडा प्रयत्न होता.दीदी आजवर तुम्ही पन्नास हजाराहून अनेक गीतं गायलीत वेगवेगळ्या भाषातून.तुमचं क्रिकेट प्रेमही सगळ्यांना माहीत आहे.मिमिक्री तुम्ही छान करता.एक छायाचित्रकार म्हणूनही तुम्ही सगळ्यांना माहीत आहात.तुमच्या मुलाखती ऐकणं हा एक आम्हा सगळ्यांचा आवडता छंद आहे म्हणाना.त्या मुलाखतीत एक गोष्ट जाणवते तुम्ही कुठली गोष्ट कधी आठवत बसला नाहीत झटकन उत्तर देत होता त्या त्या काळात जाऊन त्यावेळची गाणी तुम्ही सांगत होतात रेकॉर्डिंग कसं झालं,संगीतकार कोण होते,गीतकार कोण होते सगळं सगळं पटापट तुमच्या मुखातून बाहेर पडायचं विलक्षण स्मरणशक्ती तुमच्याकडे होती.तुमच्या वडिलांच्या परलोकी जाण्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आली.त्याच वेळी फिल्म इंडस्ट्रीमध्येही तुम्ही पदार्पण केलं होतं.जिथं खणखणीत नाणं चालत तिथं पाय रोवून उभारायला सुरुवात केली होती. तिथल्या झगमगाटी दुनियेचा तुमच्यावर कोणताच परिणाम झाला नाही.तुमचा पांढऱ्या साडीतला थाट काही वेगळाच होता. एखाद्याच्या कडे जाणीवपूर्वक पहात असताना थोडासा नाकावर तुम्ही घेत असलेला चष्मा तुमच्या दोन वेण्या तुमचं कुंकू सगळं सगळं आवडत होत आम्हाला.दीदी खरं तर तुम्हाला समाजसेवा करायची होती पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं तुम्ही गात राहून सुद्धा देशसेवा करू शकता.स्वातंत्र्यवीरांचं बोलणं शिरोधार्य मानून तुम्ही आपलं आयुष्य गाण्यासाठी वाहीलं आणि आगळीवेगळी देशसेवाच केलीत.
वंदना माने
राजाचे कुर्ले
भ्रमणध्वनी : 7387866565








































































