Last Updated on 31 Oct 2022 11:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
सांगोला । कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसून 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला.ही घटना सांगोला – मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली.अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीचा विसावा जुनोनी जवळील श्रीरामवाडी येथे होता. सांगोला-मिरज मार्गावर आणखी दोन किलोमीटर अंतरावर विसावा असताना (एम. एस. 13 डी.ई. 7938) ही कार भरधाव वेगात दिंडीत घुसली.सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील एका व्यक्तीची कार आहे.पोलिस त्याचा शोध घेत आहेत.सांगोला पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना सांगोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांत यांचा समावेश
शारदा आनंद घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, रंजना जाधव, सर्जेराव जाधव, सुनीता काटे, शांताबाई जाधव अशी मृतांची नावे आहेत. मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत.
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई | कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीचीदेखील त्यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.









































































