Last Updated on 16 Sep 2022 8:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जनावरांपासून माणसांमध्ये संक्रमण होत नसल्याने पशुपालकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास, टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधा
सांगली | जनावरांमध्ये आलेल्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सुसज्ज आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास 20 हजार जनावरांचे या अनुषंगाने लसीकरण करण्यात आले असून गाय व म्हैस वर्गीय जनावरांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येत आहे. सदरचा आजार जनावरांपासून माणसांमध्ये संक्रमित होत नसल्याने पशुपालकांनी घाबरून जावू नये, परंतु आवश्यक ती खबरदारी घ्यावी. एखाद्या जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची लक्षणे आढळल्यास बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे. तसेच आजारी जनावर हाताळणाऱ्या व्यक्तीने निरोगी जनावरांना हाताळू नये. एखाद्या जनावरांमध्ये लक्षण आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास तात्काळ संपर्क साधावा. अथवा 1962 या टो फ्री क्रमांकावरही संपर्क साधावा. लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने लसीकरण हाच प्रभावी उपाय असून सर्व जनावरांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येत आहे. लसींची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्ह्यातील जनावरांमध्ये आलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, नियंत्रण व प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत प्रसिध्दी माध्यमांना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. नयना देशपांडे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये गो वर्गीय पशुधन ३ लाख २४ हजार ७५६ व म्हैस वर्गीय पशुधन ४ लाख ९३ हजार ९५८ इतके आहे. जिल्ह्यात राज्य शासनाच्या ५१ व जिल्हा परिषदेच्या १०२ अशा एकूण १५३ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत लम्पी चर्मरोगाने बाधीत झालेल्या पशुधनाची संख्या 38 असून वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 33, पलूस तालुक्यात 4, मिरज तालुक्यात एक अशा पशुधनाचा समावेश आहे. तथापी लम्पीमुळे जिल्ह्यात अद्याप एकही जनावर दगावल्याची नोंद नाही. बाधीत गावांमध्ये किटकनाशक फवारणी करण्यात येत असून बाधीत पशुधनाच्या संपर्कात इतर पशुधन येणार नाही याबाबतची दक्षता घेण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आजारी पशुधनावर प्रोटोकॉलनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत.
बाधित गावांपासून ५ किमी अंतरावरील त्रिज्येच्या गावांमधील पशुधनास व बाधित गावांमधील निरोगी पशुधनास रिंग पद्धतीने (बाहेरून आत या पद्धतीने) Goat Pox vaccine चे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील नोंदणीकृत/ अनोंदणीकृत गोशाळा व पांजरपोळ येथील गो वर्गीय पशुधनास सुद्धा लसीकरण चालू केलेले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करणे, जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करणे, बैलगाडी शर्यतीचे तथा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करणे इत्यादी बाबींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सक्त मनाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लम्पी आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी जिल्ह्यातील पशुधनाच्या लसीकरणासाठी आवश्यक लसींची मात्रा उपलब्ध ठेवावी. त्यासाठीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रशासनास दिले असून बाधीत पशुधन आढळल्यास पशुपालकांनी त्याबाबतची प्रशासनास त्वरीत माहिती द्यावी. हा आजार वेळीच उपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी घाबरून जावू नये असे आवाहनही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यामार्फत करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.









































































