Last Updated on 22 Jun 2023 10:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दि. 27 ते 30 जूनपर्यंत उपशास मान्यता
सांगली । वारणा, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झालेला असून पाऊस अद्याप सुरू न झाल्याने पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात पुनश्च उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.कृष्णा नदीतून (टेंभू बॅरेज ते को.प.बंधारा सांगली हद्दीपर्यंत) शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या योजना सुरु राहणार आहेत.दिनांक 23 जूनपासून उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 26 जूनपर्यंत असेल.दि. 27 ते 30 जूनपर्यंत उपशास मान्यता दिल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
सांगली पाटबंधारे विभागाने दि. 14 जून ते 17 जून या कालावधीमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीतून उपसा बंदी आदेश लागू केला होता.पुढे आणखी दोन दिवस उपसाबंदी वाढवण्यात आली होती.सांगली पाटबंधारे विभागाने आज पुन्हा उपसाबंदी आदेश लागू केला आहे.हा आदेश 26 जूनपर्यंत लागू असेल.
पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल.उपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास हा उपसा अनअधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरीता रद्दबातल करण्यात येऊन उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल.याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सुक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे.धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे,असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.










































































