Last Updated on 24 Jun 2023 10:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिल्यानंतर उपसाबंदी मागे
सांगली । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात कृष्णा नदीतून (टेंभू बॅरेज ते को.प.बंधारा सांगली हद्दीपर्यंत) शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर करण्यात आलेला उपसाबंदी आदेश आज अखेर पाटबंधारे विभागाने मागे घेतला.उद्यापासून (दि.२५) पुन्हा उपसा पूर्ववत सुरु होणार आहे.
कृष्णा नदीची उपसा बंदी ताबडतोब मागे घ्या या मागणीसाठी सांगली येथील पाटबंधारे कार्यालयासमोर शनिवारी माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची दखल घेवून उपसा बंदी मागे घेत असल्याचे लेखी पत्र देण्यात आले.यापुढे पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार खपवून घेणार नाही असा इशारा माजी खा राजू शेट्टी यांनी दिला

यावेळी पाटबंधारे विभागाच्या नावाने बोंब ठोकण्यात आली पाटबंधारे विभागाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय,अधिकाऱ्याचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
उपसा बंदी मागे घेतली नाही तर कार्यालयाला ताळे ठोकू,इथून कोणत्याही परिस्थितीत हलणार नाही अशी भूमिका महेश खराडे भागवत जाधव,पोपट मोरे संदीप राजोबा यांनी घेतली.त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये बाचाबाची झाली.शेवटी राजू शेट्टी हे वरिष्ठ अधिकारी हणमंत गुणाले यांच्याशी मोबाईल वरून बोलले.त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर तोडगा निघाला आणि रविवारपासुन उपसा बंदी उठवत असल्याचे पत्र त्यांनी दिले.
यावेळी आंदोलकासमोर बोलताना शेट्टी म्हणाले,पाण्याची टंचाई आहे याची जाणीव आम्हाला आहे.मात्र सांगली जिल्यात उपसा बंदी आणि सातारा जिल्ह्यात उपसा सुरू आहे हा दूजा भाव नको,सरसकट सर्वांना एकच नियम लागू करावा एका जिल्ह्याला एक न्याय आणि दुसऱ्या जिल्ह्याला एक न्याय असे चालणार नाही.धोरण सर्वांना एकच असावे.त्यात विसंगती असू नये.
यावेळी महेश खराडे,भागवत जाधव,पोपट मोरे,संदीप राजोबा,प्रकाश देसाई,तानाजी साठे,प्रभाकर पाटील,प्रकाश माळी,शिवाजी पाटील शंकर पाटील,उत्तम पाटील,योगेश पाटील,यशवंत गायकवाड,दिगंबर देसाई,अशोक काकडे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात पुनश्च उपसाबंदी लागू करण्यात आली होती.कृष्णा नदीतून (टेंभू बॅरेज ते को.प.बंधारा सांगली हद्दीपर्यंत) शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला होता.दिनांक 23 जूनपासून उपसाबंदी आदेश लागू झाला होता.तो 26 जूनपर्यंत लागू असेल पाटबंधारे विभागाने सांगितले होते.
त्यानंतर, कृष्णा नदीची उपसा बंदी ताबडतोब मागे घ्या.अन्यथा सांगली येथील पाटबंधारे विभागाला टाळे ठोकणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला होता.









































































