Last Updated on 30 Jun 2022 6:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती केली आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.बुधवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढण्यात आले.
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे 2011 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला.त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती.शिक्षण आरोग्य स्त्रीभ्रूणहत्या या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
औरंगाबाद येथे जीएसटी विभागात सेवा बजावली.जीएसटी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. ई वे बिल नियमाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला होता.
त्यांनी धाराशिवच्या (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.कोरोना कालावधीत त्यांनी सलग 37 दिवस संपूर्ण जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये ठेवला होता. त्या सध्या संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत होत्या.







































































