Last Updated on 24 Mar 2023 10:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे.तिने अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा पराभव केला.तिने वैष्णवी पाटीलचा चार विरुध्द दहा गुणांनी पराभव केला.या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास यावेळी चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा तालीम संघाने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या.४५ किलो वजनी गटापासून ७६ किलो वजनी गटात या कुस्त्या स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व गटात अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या.महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली.
प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्यात रंगलेली फायनलची लढत अत्यंत चुरशीची झाली.सुरुवातीला वैष्णवी पाटीलने सलग ४ गुण घेत आघाडी मिळवली होती.मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षा बागडीने वैष्णवीला चितपट करत सामना जिंकला.या अंतिम सामन्यात बागडी व पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करीत चार विरुध्द दहा गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली.
तत्पुर्वी, सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिचा ९ विरूध्द २ गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसर्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा ११ विरूध्द १ अशा गुंणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
कोण आहे प्रतीक्षा बागडी ?
प्रतिक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले ते म्हणजे वडील रामदास बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल.ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत.प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल १२ वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि २२ वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला उत्कृष्ट दर्जा मिळवून देण्याचे श्रेय खेळाडू म्हणून प्रतिक्षाला जाते.तिच्या यशानंतर बऱ्याच मुली कुस्तीत आल्या आणि पालकांचाही प्रतिसाद मुलीसाठी खूप महत्वाचा ठरत आहे.ती ढाक,टांग मारणे डावात तरबेज आहे.
कोण आहे वैष्णवी पाटील?
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी पाटील ही १९ वर्षांची आहे. ती कल्याणची महिला पैलवान आहे. ती कल्याणच्या नांदीवली परिसरातील जय बजरंग तालीम संघ येथे सराव करते. तिने विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप ब्राँझ मिडलची कमाई. तिला प्रशिक्षक प्रज्वलित ढोणे यांचे मार्गदर्शन मिळते. ती सालतु डावात तरबेज आहे.










































































