Last Updated on 17 Sep 2023 6:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा जलवा; 21 धावा देत 6 बळी
कोलंबो । आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला.भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ 50 धावांवर संपवला होता.या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला.यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा जलवा दिसला.

मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले.कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केलासिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव 50 धावांत आटोपला.श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले.शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला.भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव 50 धावांवर आटोपला.भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले.हार्दिक पंड्या याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.भारताने 6.1 षटकात 10 विकेट्स राखून सामना जिंकला.शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद 51 धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.शुभमन गिल याने 19 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावांची खेळी केली.तर ईशान किशन याने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 23 धावांची खेळी केली.
भारताने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले.यापूर्वी भारताने 1984,1988,1990-91,1995,2010,2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते.भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये सात वेळा आणि टी-20 मध्ये एकदा जिंकली आहे,तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.श्रीलंकेने वनडेमध्ये पाच वेळा आणि टी-20 मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.










































































