Last Updated on 24 Jul 2025 10:21 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।
श्रावण महिना सुरू झाला की निसर्गाच्या आविष्काराने मन भरून जाते.श्रावण मास म्हणजे जणू आनंद उत्सव सृष्टिसौंदर्याचा अविष्कार आणि व्रत्त वैकल्यासाठी पवित्र मास…. म्हणून कामधम् …मोक्ष दम चैव …म्हणजे ऐहीक आणि परमार्थिक सुखासाठी या महिन्याचे महत्व विशेष आहे.या महिन्याला श्रावण मास असे का म्हणतात तर या महिन्यात पौर्णिमेच्या जवळ श्रवण नक्षत्र येत असल्यामुळे याला श्रावण असे म्हणतात.वर्षा ऋतूचा पहिला महिना असून या महिन्यात बहुतेक दर दिवशी वार व्रते धर्मकृत्यांमध्ये सांगितली आहेत.त्यामुळे या महिन्याला पवित्र श्रावणमास असे म्हणतात.पूर्वीच्या काळी या मासाला नभस् असे देखील संबोधले जायचे.
श्रावण मासातील वार आणि व्रत्ते
रविवार
श्रावण मासातील प्रत्येक रविवारी मौन धारण करून गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन केले जाते.
सोमवार
श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन, दिवसभर उपोषण व रात्री भोजन करावे.
त्याचबरोबर श्रावणातील सोमवारी नववधुने पाच वर्षे प्रत्येक सोमवारी शिवमुष्टी म्हणजे पाच मुठी धान्य शिवावर वहावे.प्रत्येक सोमवारी क्रमाने 1तांदूळ 2तीळ 3 मुग 4 जवस आणि 5 पाचवा सोमवार आल्यास सातू हे धान्य शिवमुष्टी साठी घ्यावे.
यावर्षी म्हणजे ( 2025 ) श्रावणामध्ये4 सोमवार येतात.
पहिला सोमवार
दिनांक 28 जुलै रोजी येतो,
दुसरा सोमवार 04ऑगस्ट,
तिसरा सोमवार 11 ऑगस्ट,
चौथा सोमवार 18,
ऑगष्ट रोजी येतो.
शंभूमहादेव म्हणजे शिवाच्या पूजनासाठीआणि उपासनेसाठी सोमवार हा अतिशय महत्त्वाचा सांगितलेला आहे.त्यातल्या त्यात श्रावण सोमवार तर अतिशय महत्त्वाचा आहे.
संतकवी मन्ममत स्वामींनी तर अतिशय सुंदर शब्दांमध्ये अभंगांत शिवपार्वतीचं व भक्तीच्या ओढीचं वर्णन केलेलं आहे.
जटा जुटीं गंगा व्याघ्र चर्मधारी ।
त्याची सेवा बरी वाटे जीवा । ॥1॥
वामांगी पार्वती अंगाशी विभूती ।
तेथे माझी मती बैसलीसे । ॥ 2 ॥
तया विन दुजें नये माझे मना ।
चातकांशी जाणा मेघ जैसा । ॥ 3 ॥
मत्स्या लागी जैंसे जळी जीवपण
तयातें सांडून वाचे केवीं । ॥ 4 ॥
तैसे आम्हां आहे सांडिता ही सोय ।
बहु बोलू काय वाचें आता । ॥5॥
जन्मांताचे पूर्वी शिवार्पण पिंड ।
वृत्ती ही अखंड झाली ऐसे । ॥ 6 ॥
मन्मथ शिवलिंग म्हणे ऐसा नेम ।
अंतरिचे प्रेम सदाशिव । ॥ 7 ॥
म्हणून सोमवार हा शिव भजन पूजन नामस्मरणासाठी शास्त्रात चांगला सांगितला आहे.
मंगळवार
विवाहानंतर पहिल्या श्रावण मासात पहिल्या मंगळवारी मंगळागौरी पूजन सुरू करावे.पहिल्या मंगळवारी व्यतिपात योग ,भद्रा, क्षयदिन,करिदिन इ . कुयोग असताना आणि गुरु शुक्र असताना सुद्धा मंगळागौरी व्रत्त पूजन करता येते.श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी नववधुने सलग पाच वर्षे मंगळागौरीचे व्रत पूजन करावे आणि नंतर त्या व्रत्ताचे उद्यापन करावे.
तसेच दरवर्षी प्रत्येक मंगळवारी पूजन करणे शक्य होत नसेल तर दरवर्षी किमान एका मंगळवारी पूजन करून पाच वर्षानंतर पंचवर्षात्मक पूजनाचे उद्यापन करता येईल.
बुधवार/गुरुवार
श्रावणातील प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी बुध आणि बृहस्पती पूजन करावे बुद्धी चांगली राहण्यासाठी हे पूजन सांगितलेले आहे.
शुक्रवार
श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिकेचे पूजन करावे.ही बाल संरक्षक देवता आहे.पक्वानाचा नैवेद्य दाखवून सुवासिनी स्त्रीची ओटी भरतात.सध्याच्या काळात प्रत्येक शुक्रवारी पूजन केले जाते.पण एखाद्या शुक्रवारी पक्वानाचा नैवेद्य करून सुवासिनीची ओटी भरण केले जाते,तसेच काही कारणाने परगावी जावे लागणार असेल तर अशा वेळेस तो जिवंतिकेचा फोटो बरोबर घेऊन जाता येईल आणि ज्या घरी निवास असेल तेथे पूजन आणि विसर्जन करता येते.
वरदलक्ष्मी व्रत
श्रावण महिन्यातील वार व्रत्तांपैकी एक व्रत्त आहे .श्रावण महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी वरद लक्ष्मीव्रत केले जाते. काही ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी देखील काही महिला व्रत्त करताना दिसतात.
शनिवार
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आपल्या चालीरीतीप्रमाणे शनि – मारुती – नरसिंह याचे पूजन केले जाते . एखाद्या शनिवारी मुंजा मुलाला भोजन दिले जाते.
श्रावण मासातील सण
नागपंचमी
मंगळवार दि . 29 जुलै 2025
पंचमी तिथी तीन मुहूर्त अर्थात सहा घटी व्यापिने षष्ठी नियुक्त घ्यावी असे शास्त्र आहे . हा सामान्य नियम आहे . या दिवशी देवता स्वरूप नागाचे पूजन केले जाते .सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा या ठिकाणी तर जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा आहे.
नारळी पौर्णिमा
शुक्रवार दि .08 ऑगस्ट 2025
सायाह्न म्हणजे दोन्ही दिवशी सायाह्न व व्यापिनी असता / नसता पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा करावी.
रक्षाबंधन
शनिवार दि . 09 ऑगस्ट 2024 रोजी
सूर्योदयापासून सहा घटी पेक्षा जास्ती असलेले पौर्णिमेस रक्षाबंधन करावे . सहा घटी पेक्षा कमी पौर्णिमा असता चतुर्दशीच्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्र आहे.
श्रीकृष्ण जयंती
15 वार दिनांक 15 ऑगस्ट 2025
श्रावण कृष्ण पक्षात मध्यरात्री अष्टमी असलेले दिवशी श्रीकृष्ण जयंती केली जाते.हा श्रीकृष्ण जन्मोत्सव संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा केला जातो.वैष्णव सांप्रदायात उदयव्यापिनी अष्टमीस करतात.
गोपाळकाला
शनिवार दिनांक 16ऑगस्ट 2025
श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाच्या आवडीचा गोपाळकाला करून मडक्यामध्ये / हंडीमध्ये तो ठेवून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो.
पिठोरी अमावस्या / बैलपोळा (वृषभ पूजन)
शुक्रवार दि .22 ऑगष्ट 2025
प्रदोष काल व्यापिनी श्रावण अमावस्येच्या दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते.याच दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो.श्रावण अमावस्याला कृतज्ञता म्हणून बैलाची पूजा करून पक्वानाचा नैवेद्य करून बैलांना खाण्यास देतात .याला पोळा असे म्हटले जाते . या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली जाते.
व्रत्तवैकल्यानी गजबजलेल्या चातुर्मासातील चार महिन्यांपैकी सर्वश्रेष्ठ मानला गेलेल्या या पवित्र श्रावण मासाची सांगता यावर्षी 23 ऑगस्ट 2025 रोजी होते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष, वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री – महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका – कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक, प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर, इस्लामपूर जि. सांगली.![]()













































































