Last Updated on 06 Jan 2024 6:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती.या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांवर येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सागरी सेतूचा आज दौराकरून पाहणी केली आहे.
अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवीमुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई- गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे.
ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता
सध्या फ्री वे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येते.भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल.प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत.एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे आहे.प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत.फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत.त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांडळवनातील वन्य जीवांना त्रास कमी होईल.विशिष्ठ अंतरावर स्पिडोमीटर्स लावण्यात आल्याने आपल्याला आपल्या वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते.पुलावर काही ठिकाणी 100 किमी प्रतींतास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रतीतास अशी वेग मर्यादा आहे.या पुलावरून प्रवास करताना आपल्याला तोंड भरण्यासाठी थांबावे लागणार नाही.ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे.
शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिसर सुशोभिकरण, वृक्षारोपणाच्या सूचना
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरुन तेथील सुविधांची माहिती घेत त्याअनुषंगांने विविध सूचना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. अटल सेतूची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
अटल सेतूविषयी थोडक्यात
➡️ मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना
➡️500 बोइंग विमाने व 17 आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.
➡️शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण 22 किमी लांबीचा असून त्यातील 16.50 किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित 5.50 किमी भाग जमिनीवर.
➡️भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च.
➡️सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.
➡️मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे 15 किमीने कमी झाले.
➡️महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला.











































































