Last Updated on 30 Nov 2024 8:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गडचिरोली । वैनगंगा नदीवर फिरावयास गेलेली चार शाळकरी मुले खोल पाण्यात बुडाली. यातील एका मुलाचा मृत्यू झाला, तर तिघांना वाचविण्यात यश आले आहे. जयंत आझाद शेख (१०, रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे, तर रियाज शब्बीर शेख (१४), जिशान फय्याज शेख (१५), लड्डू फय्याज शेख (१३) अशी बचावलेल्या मुलांची नावे आहेत. हे सर्वजण गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील रहिवासी आहेत.
जयंत,रियाज,जिशान व लड्डू हे सर्व जण आज दुपारी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर फिरण्यासाठी गेले होते. जिशान व लड्डू यांची आई ताजू फय्याज शेख यासुद्धा त्यांच्या सोबत होत्या. मौज म्हणून चारही मुले पाण्यात उतरली. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व जण बुडाली. त्यांनी आरडाओरड करताच काठावर बसलेल्या ताजू शेख यांनी हिंमत करुन पाण्यात उडी घेतली. त्यांनी जिशान व लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास पाण्याबाहेर काढले. परंतु जयंत शेख हा प्रवाहात वाहून गेल्याने त्यास बाहेर काढता आले नाही. ताजू शेख यांच्या मदतीला काही मच्छीमार धावून आले. त्यांनी जयंतला बाहेर काढले. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
साभार : प्रसार भारती












































































