Last Updated on 04 Sep 2022 9:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य हा सुखासाठी धडपड करत असतो.पण,सुख त्याच्या जवळ यायलाच तयार नाही.तर ते चार पाऊले दूरच जात आहे.विषय सुखाच्या मागे धावू नका कारण ते मृगजळ आहे आणि विषयामध्ये सुख देण्याचे सामर्थ्य ‘नाही हे ओळखून मनुष्याने स्वतःला अविनाशी करून घ्यावे असा मार्मिक सल्ला माजी जिल्हा न्यायाधीश गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठलराव उर्फ दादासाहेब वासकर महाराज यांनी दिला.
वाळवा तालुक्यातील बहे येथे शुक्रवारी ह.भ.प. बाजीराव हंबीरराव मोहिते यांच्या स्मृती प्रित्यर्थ कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.ह.भ.प. विठ्ठलराव उर्फ दादासाहेब वासकर महाराज यांनी ‘आपुला तो एक देव करुनि घ्यावा। तेणे विन जिवा सुख नोहे’ ।। या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे सुंदर निरूपण करताना आपल्या रसाळ वाणीतून अनेक मार्मिक दृष्टांत देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
ते म्हणाले, सुख आणि दुःख यांच्यातील कार्यकारण भाव शोधला पाहीजे.विषयांचा विरह घडला तर मनाला दुःख होते.कारण विषय सुख हे मृगजळासारखे,आभाळाच्या सावलीसारखे क्षणिक आणि अल्पजीवी असते.आणि अशा सुखाच्या पाठीमागे लागून माणसे दुःखी होतात,त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.सुखाच्या बाबतीत प्रत्येकाच्या कल्पना,उत्तरे वेगवेगळी आहेत, त्या व्याख्या,कल्पना मनुष्य हा काळ,देशाबरोबर बदलत आहे.तुमची,आमची उत्तरे वेगवेगळी येत असली तरी संतांची उत्तरे बरोबर येतात.त्रासातून सुटका होणे हेच खरे सुख आहे.
म्हणून सर्व संतांनी सुखाची अपेक्षा करताना भगवंता व्यतिरिक्त सर्व गोष्टी मायेपासून उत्पन्न झालेल्या आहेत हे ओळखुन मनुष्याने स्वतःला अविनाशी करून घ्यावे हे स्पष्ट करताना ‘जो जन्माला आला आहे,तो मरणार आहे याउलट ज्याला भगवंताचा ध्यास लागला,ज्याला भगवंत रूप प्राप्त झाले आहे तो जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही.याचा दाखला देताना मरावे परी किर्तीरुपी उरावे.जो अविनाशी आहे.त्याची किर्ती मागे राहते हेच खरे सत्य आहे आणि हीच खरी सुखाची व्याख्या आहे.हे विशद करून सांगताना वासकर महाराजांनी ‘आपुला तो एक देव करुनी घ्यावा । तेणे वीण जीवा मुख नोहे’ ।। या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे सुंदर निरूपण करताना आपल्या रसाळ वाणीतून अनेक मार्मिक दृष्टांत देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यांना परिसरातील भजनी मंडळांनी कीर्तन साथ केली.












































































