Last Updated on 17 Jul 2024 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बाहेरून आलेल्या लोकांकडून हिंसाचार; दोषींच्यावर विना जामीन गुन्हे दाखल करायला हवेत : जयंत पाटील
सांगली । विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन समाजात जाणीवपुर्वक तेढ निर्माण केला जात आहे. हे सरकारचे मोठे अपयश आहे.ज्यांनी लोकांना तिथे बोलाविले,त्यांच्यासह दोषींच्यावर विना जामीन गुन्हे दाखल करायला हवेत.आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने विशाळगडावरील गुंडशाही आणि झुंडशाहीचा जाहीर निषेध करतो,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे बोलताना दिली.शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह आमच्या पक्षाची १२ ही मते शेकापचे जयंत पाटील यांना मिळालेली आहेत.आमचे कोणतेही मत फुटलेले नाही,असेही त्यांनी सांगितले.यावेळी युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,गजापूर येथे अति क्रमणाचा काही विषय नसावा.तरीही बाहेरून गेलेल्या लोकांनी अल्पसंख्यांकांच्या घरांची आणि प्रार्थनास्थळांची मोडतोड करून लोकांना मारहाण केली,लुटालूट केली हे गंभीर आहे. तिथे काही पोलीस उभा होते, त्यांनी बघ्याची भूमिका न घेता जादा कुमक मागवायला हवी होती. विशाळगड येथील अतिक्रमणे काढायला काही लोकांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. त्यांची अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वीच काढायला हवी होती. सध्या पाऊस सुरू असताना ही अतिक्रमणे काढणे, माणुसकीला धरून आहे का? गजापूरचे कृत्य कोणत्याही शिवप्रेमीलाही आवडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजां नी उभ्या आयुष्या त अल्प अल्पसंख्याकांना अशी वागणूक कधी दिलेली नाही.
आ.पाटील म्हणाले,शेकापचे जयंत पाटील यांना आम्ही आमच्या पक्षाची १२ मते देण्याची ग्वाही दिली होती. आम्ही आमच्या सदस्यांना मते कशी द्यायची हेही सांगितले होते. आम्ही आमच्या १० आमदारांना त्यांना सूचक केले होते. वरच्या मतांची जुळणी करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांशी चर्चा करताना त्यांना काय आश्वासने दिली आहेत,ते आम्हाला माहीत नाही. त्यांनी आम्हाला सांगायला हवे,आम्ही ही-ही आश्वासने दिली आहेत,आणि त्यांनी निश्चित अशा निर्णया पर्यंत पोचायला हवे. त्यांनी चर्चेला जाताना विरोधी पक्षाला सोबत न्यायला हवे होते.
आ.पाटील म्हणाले,मी आजपासून पक्षाच्या वतीने जिथे आम्ही विधनासभेला लढणार आहोत,त्या जिल्ह्यां चा संपर्क दौरा करीत आहे. पहिल्या टप्प्यात सातारा,सोलापूर,जळगाव,धुळे,नाशिक,बीड, जालना,परभणी आदी जिल्ह्यांचा दौरा करून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हे घेणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी साधारण १७०-१७२ पर्यंत जाऊ शकते. काही मतदारसंघ व्यवस्थित हाताळले, तर तिथेही आमचा उमेदवार विजयी होऊ शकतो. उद्या जे सरकार येईल,ते लवकरात लवकर जिल्हा परिषद,पंचायत समिती,तसेच महानगर पालिका,नगर पालिका आदी निवडणुका घेईल. सध्या व्यवस्था भ्रष्ट झाली असून सर्वत्र पैशाचा सुळसुळाट वाढला आहे. लोकांना याचा त्रास होत आहे.










































































