Last Updated on 15 Jan 2022 10:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एकदिवसीय,टी-२० नंतर विराट कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले,अचानक ट्विट करून दिला आश्चर्याचा धक्का
मुंबई |
एकदिवसीय आणि टी ट्वेन्टीनंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतला आहे.आज ट्विटरवरुन आपल्या कसोटी कर्णधारपदाचा त्याने राजीनामा दिला. मात्र, तो खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅट खेळत राहणार आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.कालच भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात २-१ ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला.हा धक्का विराटला खूपच बोचणारा ठरला.
कोहलीने गेल्या तीन महिन्यांत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले.आता कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आहे. मात्र, तो खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅट खेळत राहणार आहे.
नोटमध्ये फक्त दोन लोकांचा उल्लेख
कोहलीने सोशल मीडियावर आपल्या नोटमध्ये फक्त दोन लोकांची नावे दिली आहेत. शेवटच्या चार ओळींमध्ये त्याने खेळाडूंमध्ये फक्त महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षकात फक्त रवी शास्त्री यांचा उल्लेख केला आहे. त्याने तीन प्रशिक्षकांखाली कर्णधार म्हणून काम केले आहे. त्यात शास्त्रीशिवाय अनिल कुंबळे आणि राहुल द्रविडचाही समावेश आहे.
कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
“संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले.”
“कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं हा एक भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.”
“मी बीसीसीआयचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. भारतीय संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे…
“आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, MS धोनीने भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं नाव सुचवलं. त्याचेही मनापासून आभार”












































































