Last Updated on 18 Sep 2024 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आपण आकाशात अनेकदा विमान पाहतो. लहानपणी आपल्याला याचे विशेष कौतुक वाटते. आकाशात लुकलुकणारे दिवे पाहून कित्येक काळ आपण त्याकडे पाहतच बसतो. मग विमानाला कसे पंख असतात. ते आकाशात कसे उडते याबाबत आपण वाचतो किंवा ऐकतोही. पण जगातील जवळपास सगळ्या विमानांचा रंग पांढराच का असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? नाही ना? पण काही लोकांना हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचे उत्तरही शोधून काढले. तर पाहूयात विमान पांढरे असण्यायामागची नेमकी कारणे काय आहेत ते…
विमानाने प्रवास करताना आपण कधी विचार करत नाही की अधिकाधिक विमानाचा रंग नेहमी पांढरा का असतो. विमानाला रंग नसतो असे काही नाही. कलरफुल विमानांची संख्या खूप कमी आहे. अधिकाधिक विमानाचा रंग हा पांढराच दिसून येतो.
धावपट्टीपासून ते आकाशपर्यंत विमान पुर्ण वेळ उन्हात असतं. त्यामुळे सुर्याची किरणे थेट विमानावर पडतात. अशातच पांढरा रंग विमानाला 99 टक्के सुर्याच्या परावर्तीत करतो. सुर्याला इन्फ्रारेड किरण असल्याने, विमानामध्ये तीव्र उष्णता निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होण्यापासून वाचलं जातं.
विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे विमानावर कोणत्याही प्रकारच्या भेगा पडलेल्या सहज दिसतात. जर विमानाचा रंग पांढऱ्याऐवजी इतर काही रंगाचा असेल तर भेगा लपल्या जातात. त्यामुळे पांढरा रंग विमानाच्या देखभालीसाठी आणि तपासणीसाठी उपयुक्त ठरतो.काळ्या रंगामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. याशिवाय विमानाचा रंग पांढरा असण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेली खराबी म्हणजेच तेल किंवा ऑइल लिकेज लवकर कळतात. याशिवाय विमानाला रंग देण्यासाठी साधारणत: ३ लाख ते १ कोटी रुपये इतका खर्च येतो. हेच जर वेगळा रंग द्यायचा म्हटल्यास ही किंमत आणखी वाढेल त्यामुळे कंपन्या पांढराच रंग देत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो.
दरम्यान, विमानाचा रंग पांढरा करण्यामागील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचं वजन खूपच कमी आहे. पांढऱ्या रंगाने रंगवल्याने विमानाचे वजन वाढत नाही आणि हे आकाशात उडण्यासाठी फायदेशीर असतं.










































































