Last Updated on 03 Jul 2022 3:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर ॲड.राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते.अध्यक्षपदी ॲड.राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी मतदान केले.
राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत.ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मते मिळाली.तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले.एकूण तीन आमदार तटस्थ राहिले.अशा पद्धतीने नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.
राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी ॲड नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले.
तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजता वंदे मातरम् ने विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली.
कोण आहेत राहुल नार्वेकर
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई










































































