Last Updated on 21 Nov 2024 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीशिवाय नवं सरकार बनणार नाही, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी यांना सरकार बनवण्यासाठी छोटया पक्षांची मदत घ्यावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. कडू यांचा पक्ष परिवर्तन महाशक्तीचा घटक आहे. परिवर्तन महाशक्ती १२२ जागा लढत असून २५ जागेवर सकारात्मक परिणाम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बच्चू कडू म्हणाले, माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपनं खालच्या पातळीवर प्रचार केला. काँग्रेस आणि भाजप दोघेही अचलपूर मतदारसंघात संभ्रमात होते. काँग्रेसवाल्यांनी काही ठिकाणी भाजपला आणि भाजपनं काही ठिकाणी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितलं. दोघेही एकमेकांशी लढत राहिले. दोघांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडणं होते. निवडून येणे हा त्यांचा विषयच नव्हता. मात्र, आमचा विजय निश्चित आहे.












































































