Last Updated on 21 Sep 2022 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत असे ठरले.
मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्य सरकारने पोलिसांना मोठा दिलासा देताना नैमित्तिक रजा 12 वरून 20 केल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.
- धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
- भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
- पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.
- राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होणार आहे.
- पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे.
- सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाणार आहे.
- नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा देण्यात येणार आहे.
- वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात येणार असून सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
- बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्यात आला आहे.
- औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्यात येणार आहे.
हेही वाचा
कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल












































































