Last Updated on 19 Jul 2023 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधे आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.राजधानी मुंबई आणि उपनगरात कालपासूनच जोरदार पाऊस पडत असून शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे.रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला.कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
ठाणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं चांगलीच संततधार धरली आहे.आजही पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळं भिवंडी,अंबरनाथ,बदलापूर,शहापूर, कल्याण,डोंबिवली,मुरबाड आणि उल्हासनगर या सर्वच तालुक्यांसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे.पावसामुळे कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गावरची बंद झालेली वाहतूक संध्याकाळी सुरू झाली.लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक पनवेलमार्गे वळवली असून मुंबई- पुणे दरम्यानच्या इंटरसिटी,सिंहगड,डेक्कन, इंद्रायणी या चार गाड्या रद्द केल्या आहेत.नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून ठाणे बेलापूर मार्ग, सीबीडी बेलापूर बस स्थानक, एपीएमसी मार्केट परिसर या भागांमध्ये पाणी साचलं आहे.
रायगड जिल्ह्यात सावित्री,अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कुंडलिका आणि पाताळगंगा नदीनं इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. महाड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या बचावासाठी ४ ठिकाणी बचाव पथके बोट साहित्यासह तैनात करण्यात आली.चिरनेरमध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त घरं पाण्याखाली गेली.रसायनी पोलीस ठाणं पाण्याखाली गेलं.आपटा गावातही अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत.अलिबाग- रेवदंडा मार्गावर आक्षी इथं आणि अलिबाग पोयनाड मार्गावर पळी इथं रस्त्यावर झाड, विजेच्या तारा पडल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
पुरामुळे नागोठणे शहरात पाणी शिरलं असून प्रमुख तिन्ही रस्ते बंद झाले.काही ठिकाणी NDRF,राज्य आपत्ती निवारण दल, स्थानिक यंत्रणांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाटात चिपळूणकडून मुंबई कडे एकेरी वाहतूक सुरु केली असून खेडकडून चिपळूणकडे येणारी लहान वाहनं पाली कळबंस्ते मार्गे चिपळूणकडे सोडण्यात येत आहेत,असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२४ च्या सरासरीने ९९८ मिमी पावसाची नोंद झाली असून नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. सखल पुलांवर पाणी वाढले आहे.पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान,हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून कयाधू नदीला पूर आला आहे.हिंगोली शहरात सैलानीबाबा चौकात एक घर कोसळून एक महिला जखमी झाली.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पूर आला असून झाडे उन्मळून पडली आहेत.राधानगरी तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू असून पावसाची एकूण परिस्थिती बघता पर्यटकांनी सहली टाळाव्यात असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात कोयनानगर परिसरात पाणी पातळीत वाढ झाल्याने काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रायगड व गडचिरोली,पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्याने पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे.सिंधुदुर्ग,मुंबई,ठाणे या जिल्ह्याची उद्याची स्थानिक स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, सद्यस्थितीत गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत.
या भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून पालघर,ठाणे,मुंबई, रायगड,रत्नागिरी,पुणे,सातारा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.येत्या 24 तासांमध्ये उत्तर कोकण, राडगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तसेच मुंबई,ठाणे,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले.सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.










































































