Last Updated on 02 Dec 2023 5:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा.राजू शेट्टी यांचे कारखाना बंद पाडण्याचे आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. आमचा साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी दर देत असताना त्यांचे सांगली जिल्ह्यात पहिले आंदोलन आमच्या करखान्यावरच का? असा सवाल राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केला.यावेळी त्यांनी माजी खा.राजू शेट्टी यांच्या या आंदोलनास राजकीय झालर असल्याचा आरोपही केला.
सध्याचा कमी पाऊसमान,ऊसाचे निघणारे उत्पादन,आणि आता पडणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्यासमोर अनेक अडचणी असताना राजू शेट्टी यांचे काटा बंद आंदोलन हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे.
आम्ही माजी खा.राजू शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना आमची भूमिका समजावून सांगितली. तरीही त्यांनी काटा बंदचा घेतलेला निर्णय चुकीचा व निषेधार्ह आहे.
कडेगाव येथे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी रुपये ३१०० ची पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आम्ही चालू गळीत हंगामासाठी रुपये ३१०० ची पहिली उचल जाहीर केली आहे. हा काय अंतिम दर नाही. यावर्षीच्या प्रत्यक्ष साखर उताऱ्यावर रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केली जाईल. त्यातून तोडणी व वहातुक खर्च वजा जाता उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरएफ) देणे सर्वांना कायद्याने बंधनकारक आहे. गळीत हंगाम संपल्यानंतर साखर विक्रीस मिळणाऱ्या भावावरून ऊसाला आणखी जास्त दर निघत असेल,तर आम्ही देवू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणाच्या भूलथापांना बळी न पडू नये,असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले.
यावेळी देवराज पाटील,कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,तसेच संचालक व अधिकारी उपस्थित होते.






































































