Last Updated on 23 Nov 2022 6:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांची राजारामनगर येथे घोषणा
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १,वाटेगाव-सुरुल युनिट नं. २ व कारंदवाडी युनिट नं. ३ कडे गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये येणाऱ्या ऊसास ३ हजार रुपये प्रति मे. टन पहिला हप्ता देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी राजाराम नगर येथे केली.
श्री.पाटील म्हणाले,कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गळीत हंगाम समाप्ती नंतर प्रत्यक्ष सरासरी साखर उताऱ्यावरील एफआरपी मधून तोडणी खर्च वजा जाता येणारी उर्वरित रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली जाईल.कारखान्यांचे तिप्पेहळ्ळी- जत युनिट नं. ४ कडे गळीत येणाऱ्या ऊसास दोन हजार ५०० रुपये आदा करणेचे ठरविले आहे.लोकनेते राजारामबापू पाटील यांनी नेहमी शेतकऱ्यां च्या हिताचे निर्णय घेण्याचे काम केले आहे. तसेच राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आ. जयंतराव पाटील यांनीही शेतकरी हा केंद्रबिंदू मानून निर्णय घेतलेले आहेत.
आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची आदर्शवत वाटचाल चालू असून आपला कारखाना सातत्याने शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील आहे.तरी सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी आपण पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करावा. आपल्या कारखान्याचे साखराळे युनिट नं. १ ला ११ लाख मे. टन,वाटेगाव- सुरुल युनिट नं. २ ला ६ लाख मे. टन,तसेच कारंदवाडी युनिट नं. ३ कडे ५ लाख मे. टन असे २२ लाख मे. टन उदिष्टे ठेवण्यात आले आहे.तसेच तिप्पेहळ्ळी-जत युनिट नं. ४ कडे. चार लाख मे. टन उद्दिष्ट पुर्ण करण्यास सहकार्य करावे असे,आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले.कारखान्याच्या चारही युनिटमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे ऊस गळीत चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील,संचालक विराज शिंदे,दिलीपराव पाटील,श्रेणिक कबाडे,एल.बी. माळी,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,चीफ अकौंटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.










































































