Last Updated on 08 Sep 2024 1:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची माहिती
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सभासदांना दरमहा ७ किलो व दिवाळीसाठी ७ किलो अशी एकूण ९१ किलो साखर देत आहे. मात्र दि.१ ऑगस्ट २०२४ पासून कारखान्याच्या सभासदांना दरमहा ९ किलो व दिवाळीसाठी ९ किलो अशी एकूण ११७ किलो साखर केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. तसेच कारखान्याकडील रुपांतरीत ठेव व परत केलेल्या विस्तारवाढ व सहवीज निर्मिती प्रकल्प ठेव रुपये १४७ चे व्याज १५ ऑक्टोबरला सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री.पाटील म्हणाले, आपल्या करखान्याने कारखाना विस्तारवाढ व सहविज प्रकल्पास सन २०१४- २०१५ मध्ये प्रतिटनास १४७ रूपये ठेव घेतली होती. ती ठेव ऊस उत्पादकांना परत केली आहे. मात्र या ठेवीं वरील दि. १ जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यतचे व्याज १५ ऑक्टोबरला सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
आपण आपले मार्गदर्शक माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या हिताचे नेहमीच निर्णय घेतले आहेत. आपल्या कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर देण्याची परंपरा जपली आहे. आम्ही ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. ठिंबक सिंचन योजना,ड्रोन औषध फवारणी,क्षारपड सुधारणा सच्छिंद्र पाईप योजना व विविध खते उपलब्ध करुन दिली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे. गळीत हंगाम सन २०२४- २५ मधील ऑफ सिझनची कामे अंतिम टप्प्यात आली असून शासनाने निश्चित केलेल्या वेळेत कारखाना चालू केला जाईल.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील,चिफ अकौटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.










































































