Last Updated on 10 Jul 2023 5:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.शामराव ज्ञानदेव पाटील (इस्लामपूर) यांची,तर उपाध्यक्षपदी विजयराव विठ्ठलराव यादव (बावची) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झालेली आहे.सौ.उर्मिला राजमाने यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची आज (सोमवारी) दुपारी बैठक पार पडली.या बैठकीत संचालक माणिक पाटील (बोरगाव) यांनी अध्यक्ष पदासाठी प्रा.शामराव पाटील यांचे नांव सुचविले,त्यास संचालक डॉ.प्रकाश पाटील (येडेनिपाणी) यांनी अनुमोदन दिले.तर संचालक धनाजीराव पाटील (जुनेखेड) यांनी उपाध्यक्ष पदासाठी विजयराव यादव यांचे नांव सुचविले,त्यास संचालक संजय पाटील (नेर्ले) यांनी अनुमोदन दिले. प्रत्येकी एकच अर्ज आल्याने अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. प्रा.पाटील यांची फेरनिवड असून विजयराव यादव यांना नव्याने संधी देण्यात आली आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह राजारामबापू समूहातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्या साठी गेल्या 42 वर्षांपूर्वी ही बँक स्थापन केली असून सध्या माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने राज्यात आपला नांवलौकिक केला आहे.बँकेकडे 2130 कोटींच्या ठेवी असून 1517 कोटींची कर्जे वाटप केली आहेत. एकूण व्यवसाय 3647 कोटींचा आहे. बँकेच्या संपूर्ण राज्यात 46 शाखा आहेत.पारदर्शी व काटकसरीचा कारभार ही बँकेची वैशिष्ट्ये आहेत.











































































