Last Updated on 10 Oct 2022 8:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मेहसाणा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा गावाला भारतातील पहिले 24 x 7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले.यासह मोढेरा हे देशातील पहिले सोलर व्हिलेज बनले आहे.
पंतप्रधानांनी गुजरातमधील मोढेरा,मेहसाणा येथे 3900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.पंतप्रधानांनी मोढेरा हे भारतातील पहिले 24 x 7 सौरऊर्जेवर चालणारे गाव असल्याची घोषणा यावेळी केली.मोदींनी गुजरातमधील मोढेरा येथील मोढेश्वरी माता मंदिरातही देवीचे दर्शन घेत पूजा केली.वीजेपासून ते पाण्यापासून ते रस्ते-रेल्वेपर्यंत,दुग्धव्यवसायापासून ते कौशल्य विकास आणि आरोग्यापर्यंत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली.
देशातील पहिल्या सौर उर्जा गावाविषयी…
सूर्य मंदिरासाठी जगप्रसिद्ध असलेले गुजरातमधील मोढेरा गाव आता देशातील पहिले राउंड द क्लॉक आणि सात दिवस सौरऊर्जेवर चालणारे गाव बनले आहे.भारतातील पहिली ग्रीड कनेक्टेड MWh स्केल बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली येथे स्थापित करण्यात आली आहे.केंद्र आणि राज्य सरकारने मिळून दोन टप्प्यांत हे सोलर व्हिलेज तयार केले आहे.जगप्रसिद्ध मोढेराला नवी ओळख देण्यासाठी केंद्र आणि गुजरात सरकारने 80.66 कोटी रुपये खर्च केले आहेत.सौरऊर्जेवर आधारित अल्ट्रा-आधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा असलेले हे पहिले आधुनिक गाव आहे.
मोढेरा येथील सर्व 1300 घरे जी सौरऊर्जेवर चालतात,प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेची सोलर रूफटॉप यंत्रणा आहे.या सौर पॅनेलद्वारे दिवसा वीज पुरवठा केला जातो आणि संध्याकाळी BESS (बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम) द्वारे घरांना वीजपुरवठा केला जातो.या प्रकल्पाद्वारे अक्षय ऊर्जा निर्मिती करणारे मोढेरा हे भारतातील पहिले गाव ठरले आहे.मोढेराला सोलर व्हिलेज बनवण्यासाठी मेहसाणा जिल्ह्यातील सुजानपुरा येथे बॅटरी ऊर्जा साठवण व्यवस्थेसाठी ऊर्जा केंद्र बांधण्यात आले आहे, ते सूर्य मंदिरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे.
पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल
या प्रकल्पाला ‘मोढेरा सूर्य मंदिर आणि शहराचे सौरीकरण’ असे नाव देण्यात आले आहे.हा प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने 12 हेक्टर जमीन दिली.या जमिनीवर सुमारे 22000 सोलर पॅनल बसवण्यात आले असून,त्यांच्या मदतीने जवळपासच्या तीन गावांना वीजपुरवठा केला जात आहे.गावासोबतच येथे असलेले जगप्रसिद्ध मोढेरा सूर्यमंदिर पर्यटकांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या थ्री-डी प्रोजेक्शनद्वारे मोढेराच्या समृद्ध इतिहासाची माहिती देणार आहे.येथे दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत थ्रीडी लायटिंग शो आयोजित केला जाईल,जो पर्यटकांनाही आकर्षित करेल.







































































