Last Updated on 10 May 2023 4:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. न्यायालयाचा निकाल कधी येणार यावरुन चर्चा सुरु होती. आता महाराष्ट्राच्या प्रकरणातील निकाल उद्या समोर येणार आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे हा निकाल कधी लागणार, याकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती.त्याचा निकाला आता उद्या लागणार आहे.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील याविषयी माहिती दिल्याचे लाईव्ह लॉने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या.राज्यसभेची मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे 25 आमदारांसह सुरतला रवाना झाले.त्यावेळेस शिवसेनेत पडलेल्या ठिणगीची माहिती अवघ्या महाराष्ट्राला मिळाली.त्यानंतर एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटना घडू लागल्या.ठाकरेंच्या गटात असणारे अनेक आमदार हळूहळू शिंदेंच्या गटात सामिल झाले.त्यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले.या बळाच्या जोरावर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.
एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान देण्यात आले.16 आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशीही याचिका यावेळी करण्यात आली होती.याप्रकरणी उद्या निकाल लागणार आहे.त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतात का? की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला उद्या ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.












































































