Last Updated on 20 Sep 2022 7:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD) 47 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार 2022 प्रदान
![]()
नवी दिल्ली । मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांना जर आज कोणाचा सर्वात मोठा धोका असेल,तर ती नव्या युगातील डिजिटल माध्यमे नाहीत,तर प्रसारमाध्यमांना मुख्य धोका या वृत्त वाहिन्या स्वतः आहेत.खरी पत्रकारिता सत्याचा सामना करणे, सत्य लोकांसमोर आणणे आणि आपल्या व्यासपीठावर दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची समान संधी देणे ही असते,असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD) 20 व्या बैठकीचे आणि 47 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव, अपूर्व चंद्रा आणि एआयबीडीच्या संचालक फिलोमेना नानाप्रगासम उपस्थित होत्या.
चर्चात्मक कार्यक्रमात अशा वक्त्यांना बोलावणे, जे ध्रुवीकरण करतात, खोटे, दिशाभूल करणारे समज पसरवतात, जे अशा वादविवादात बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, अशा लोकांमुळे वाहिन्यांची विश्वासार्हता कमी होते, असे मत अनुराग ठाकूर यांनी मांडले. “वक्ते कोण असावेत, कार्यक्रमाचा सूर कसा असावा, दृश्य कशी असावीत याबद्दलचे तुमचे निर्णयच, प्रेक्षकांच्या मनात तुमच्याविषयीची विश्वासार्हता निश्चित करत असतात.कदाचित, एखादा प्रेक्षक, मिनिटभर तुमची चर्चा बघण्यासाठी थांबेलही, मात्र तो कधीही तुमच्या सूत्रसंचालक/निवेदकावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या वाहिन्या किंवा ब्रॅंड विश्वासार्ह आणि पारदर्शक बातम्या देणारा स्त्रोत आहे, असे त्याला कधीही वाटणार नाही.” असे ते पुढे म्हणाले.
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तव्याचा बाईट तुमच्या वाहिनीकडे असेल, तर तेवढ्यावरुन तयार झालेलं मत दाखवू नका, तर त्या म्हणण्यामागचा उद्देश आणि अर्थ समजून घेत, स्वतः त्याचा अन्वयार्थ लावा, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले. आपल्या वाहिनीवर येणारे पाहुणे आणि वाहिन्यांसाठीही स्वतःच काही अटी घालून घ्याव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.
भारतीय प्रसारमाध्यमांची कोविड महामारीच्या काळातील भूमिका’ ही एक यशोगाथा आहे, असं सांगत, ते म्हणाले की कोविड-19 विषयी जनजागृती करणारे संदेश, सरकारच्या महत्वाच्या मार्गदर्शक सूचना, डॉक्टरांकडून मोफत ऑनलाईन मार्गदर्शक सेवा-सुविधा देशातल्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची होती.
या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 2021 आणि 2022 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रेडिओ टेलिव्हिजन ब्रुनेईला 2021 साठीचा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर 2022 चा प्रशंसा पुरस्कार अर्थव्यवस्था, नागरी सेवा, दळणवळण, गृहनिर्माण आणि समुदाय विकास मंत्रालय, फिजी प्रजासत्ताक आणि फिजी प्रसारण महामंडळाला विभागून देण्यात आला.
2021 चा जीवनगौरव पुरस्कार कंबोडियाचे माहिती आणि दळणवळण मंत्री खियू खानहरिथ यांना प्रदान करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेचे (एआयबीडी ) अध्यक्ष मयंक अग्रवाल यांना 2022 साठीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतातील विविध परदेशी मोहिमांचे प्रमुख, एआयबीडी सदस्य देशांचे प्रतिनिधी, प्रसार भारतीचे अधिकारी आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
![]()
आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्था (एआयबीडी) विषयी:
युनेस्कोच्या (UNESCO) संयुक्त विद्यमाने 1977 मध्ये आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेची (एआयबीडी) स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र आशिया आणि प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UN-ESCAP) मधील देशांना इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम विकासाच्या क्षेत्रात सेवा देणारी एक अनोखी प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था आहे. याचे संचालन मलेशिया सरकारने केले आहे आणि सचिवालय क्वालालंपूर येथे आहे.
एआयबीडीमध्ये सध्या 26 पूर्ण सदस्य (देश) आहेत, ज्यांचे प्रतिनिधित्व 43 संस्था आणि 50 संलग्न सदस्य (संस्था) करतात यासह 46 देश आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे असे एकूण 93 सदस्य आणि आशिया, प्रशांत, युरोप, आफ्रिका, अरब देश आणि उत्तर अमेरिकेतील 50 हून अधिक भागीदार आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे एआयबीडीचे पूर्ण सदस्यत्व आहे. भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक असलेली प्रसार भारती, एआयबीडीच्या विविध सेवांचा उपयोग करते.
![]()









































































