Last Updated on 20 Oct 2024 12:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये – आदिती तटकरे
Ladki Bahin Yojana News Update : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याने ही योजना बंद होणार, अशीही चर्चा सुरू झाली आणि गोंधळ निर्माण झाला. त्यावर आता अदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सध्या सूरू आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
अदिती तटकरेंनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.
सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
यासंबंधी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही X वर खुलासा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी x वर म्हटले आहे की, या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये.
निवडणूक आयोग काय म्हणाले?
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.







































































