Last Updated on 21 Jan 2022 1:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मराठी पत्रकारितेत 50 वर्षांहून अधिक काळ योगदान
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
मुंबई ।
पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला. त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार,कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समनव्य संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी युवा पत्रकारांना मार्गदर्शन दिले. रायकर हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांच्या निधनाने राज्य पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली
पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरित्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.










































































