Last Updated on 23 Aug 2023 2:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ऐझॉल । मिझोरामच्या ऐझॉलमध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला.ही घटना सायरंग परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घटनेच्या वेळी परिसरात 35-40 लोक होते.हे सर्व लोक ढिगाऱ्याखाली गाढले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ऐजॉलपासून 21 किमी अंतरावर घडली.रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.मिझोरामच्या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे मजूर काम करत होते. दुर्घटनाग्रस्त पुल क्रमांक 196 ची उंची 104 मीटर आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे.या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.पण या पुलाचे काम पूर्ण होऊन तो सुरू होण्यापूर्वीच तो दुर्घटनेला बळी पडला आहे.
दुर्घटनास्थळी अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.बुधवारी सकाळी हा अपघात झाला तेव्हा जवळपास 40 मजूर घटनास्थळी उपस्थित होते.कुरुंग नदीवर बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या रेल्वे पुलाचे काम सुरू होते.दुर्घटनास्थळ ऐझॉलपासून 21 किमी अंतरावर आहे.आतापर्यंत सर्व मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.त्याचबरोबर आणखी काही जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पीएम मोदी-सीएम झोरामथांगा यांनी केले ट्विट
पंतप्रधान मोदींनीही या घटनेबाबत ट्विट केले आहे.त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही ट्विट केले आहे.त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या लोकांचे त्यांनी आभार मानले.












































































