Last Updated on 05 Jul 2023 12:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
अंकुश चव्हाण : अधोरेखित ऑनलाईन
लहानपणापासून कुस्तीची आवड असणारे स्व.गणपतराव अण्णा म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्तीतला तेजस्वी हिरा.पहिले डबल महाराष्ट्र केसरी म्हणून आण्णांची ओळख कुणाला सांगावी लागत नाही.त्यांचे पूर्ण नाव गणपतराव गोपाळा चव्हाण पण,आण्णा हे गणपत खेडकर म्हणून सर्वदूर परिचित होते.
पैलवान गणपतराव खेडकर हे महाराष्ट्र केसरी झाले ते साल होतं 1964. त्यावेळी ते पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले.अमरावतीला त्यांनी एकदा कुस्ती जिंकली अन् दुसऱ्यांदा 1965 ला नाशिकला.आणि त्यावेळी कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान गणपतराव खेडकर यांनी आपल्या नावावर कायमचा करून इतिहासात नोंद केली.अण्णांचा आवाजही अण्णांसारखाच भारदस्त होता.पहिल्यांदा ऐकणारा निश्चित घाबरेल.पण अण्णा स्वभावाने गोड होते.त्यांनी कुस्तीचे घडे आपल्या वडिलांकडून घेतले.अण्णांचे भाऊ पैलवान वासुदेव गोपाळा चव्हाण हे देखिल बलदंड ताकदीचे मल्ल होते,त्यांनी देखील अनेक कुस्ती मैदान गाजवलेली आहेत..!
सुरुवातीला सखाराम वस्तादांच्या आश्रयाखाली मंत्री तालीम, इस्लामपुरात,तर नंतरच्या काळात शाहू विजय तालिम मंडळ,गंगावेश,कोल्हापुरात ते कुस्तीचे धडे गिरवायचे.तिथेच त्यांचा सुवर्णकाळ घडला,त्यांनी अनेक मल्ल घडवले त्यामध्ये महाबली सतपालला हरवणारे बिजली मल्ल पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.या कुस्तीमध्ये पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांनी महाबलीला आसमान दाखवल्यानंतर कोल्हापूरवासियांनी बिराजदार मामा आणि त्यांचे वस्ताद पैलवान गणपतराव खेडकर यांची न भूतो न भविष्यती अशी हत्तीवरून मिरवणूक काढली होती,तो क्षण कुस्ती शौकीन आजही विसरलेले नाहीत.

एकूण कारकीर्दीत अण्णांनी खूप मानसन्मान मिळविले होते.1963 ते 78 या काळात ते मॅटवरची कुस्तीही खेळले.नुसती खेळलेच नाहीत,तर भारतात पाच वेळा पहिले आले.जागतिक कुस्ती स्पर्धेत ते जगज्जेत्या बरोबर लढले आणि मित्रत्वाच्या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन रशिया, इराण इत्यादी देशांच्या स्पर्धकांबरोबर लढले होते
मातीतील ‘कुस्ती कधीही संपणार नाही आणि कुणीही ती संपवू शकत नाही,असे ते म्हणत.महाराष्ट्राची ती प्राण आहे, ती राहणारच..! पण जागतिक स्पर्धेत मॅटवरील कुस्तीची गरज आहे, म्हणून ती खेळण्यात काहीही गैर नाही. खेळाकडे खेळकर नजरेनेच पाहिलं पाहिजे,असेही ते सांगायचे.
1960-62 ला पतियाळामध्ये पहिली मॅट आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.आपल्याकडे अजून पाहिजे त्या प्रमाणात मॅट उपलब्ध नाही.पण आखाडे तयार आहेत,ते संपत नाहीत,असं ते म्हणाले होते.मॅटसाठी ‘कोच’ लागतो.मातीसाठी वस्तादच लागतो,असं ते म्हणायचे.
आजच्या जगात कुस्ती कला लोप पावत चालली असून मानधन वाढले आहे,पण आवड वाढली नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.दुर्दैवाने ती खरी ठरत आहे!
एकेकाळी कुस्तीचे आखाडे गाजवणाऱ्या,तिच्यावर अधिराज्य करणाऱ्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अण्णांचं हे यश आभाळाला गवसणी घालणारं होतं !
![]()










































































