Last Updated on 20 Dec 2025 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्राच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. शालिनीताई या माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या पत्नी होत्या. 94 वर्षीय शालिनीताई यांनी मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून शालिनीताई या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. शालिनीताई यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील कोरेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री राहिलेल्या शालिनीताई पाटील या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
शालिनीताई पाटील या राज्यातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. शालिनीताईंचं राजकीय आणि सामाजिक कार्य मोठं असून त्या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. शालिनीताईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह केल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच पुढे त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या देखील होत्या.
शालिनीताई पाटील यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि चर्चेचा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. शालिनीताई यांनी 1980 मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. महसूल मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं.
त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1990 मध्ये जनता दलातून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते.
राजकीय प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर त्यांनी टीका केली होती. त्यांची भूमिका तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाविरोधात असल्याने शरद पवार यांनी 2006 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी क्रांतिसेना महाराष्ट्र या नावाच्या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. मात्र या पक्षाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि कालांतराने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.










































































