Last Updated on 10 Mar 2025 1:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : सध्या महिला चांगले शिक्षण घेत विविध क्षेत्रात मोलाचे योगदान करीत असलेल्या पाहून समाधान वाटते. मात्र त्याचवेळी महिलांच्यावर वाढलेले अन्याय-अत्याचार पाहून मन सुन्न होते. आता महिलांनी एकमेकीचा हातात हात घेत,दुर्गेचा अवतार धारण करून समाजातील नराधमांना चाप बसवायला हवा,अशी भावना राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी उरूण इस्लामपूर येथील समारंभात बोलताना केले.
उरूण इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,माँसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमां ना पुष्पहार घालून अभिवादन केले. शहराध्यक्षा पुष्पलता खरात,माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,शहर कार्याध्यक्षा उषा मोरे-पंडीत प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी राजारामबापू सहकारी बँकेने देशात २३ वा क्रमांक मिळविल्याबद्दल प्रा.शामराव पाटील,तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या शहर कार्याध्यक्षा उषा मोरे-पंडीत यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.शामराव पाटील पुढे म्हणाले,आमच्या काळात महाविद्यालयात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यात कमी मुली होत्या. मात्र आता मुलींची स्वतंत्र महाविद्यालये सुरू करावी लागली आहेत. महिला मोठया प्रमाणात शिक्षण घेत प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. सध्या समाजात महिलांच्या वरील अन्याय-अत्याचार वाढले आहेत. त्यास महिलांनी मोठया धैर्याने सामोरे जायला हवे.
शहराध्यक्षा पुष्पलता खरात म्हणाल्या, आम्ही इस्लामपूर शहरातील महिलांना संघटीत करून त्यांना ताकद देत आहोत. शहरातील महिलांच्याकडून आम्हास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
उषा मोरे-पंडित यांनी २१ दिवसात नर्मदा परिक्रमा कशी पूर्ण केली? त्याचे प्रवास वर्णन व अनुभव कथन केले. याप्रसंगी केक कापून सर्वांचे तोंड गोड केले.
यावेळी सल्लागार कुसुमताई जाधव, शहर उपाध्यक्ष योगिता माळी, शहर उपाध्यक्षा मनिषा पेठकर, मालन वाकळे, सुनंदा साठे, सुप्रिया पेठकर, वैशाली पाटील,अंजना चव्हाण, जयश्री चव्हाण, दिपाली जगताप, सुहासिनी जंगम यांच्यासह महिला उपस्थित होत्या.












































































