Last Updated on 14 Nov 2024 7:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र हा विकसित भारताचे ग्रोथ इंजिन होईल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. खारघर इथल्या सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. रायगड, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली.
राज्यात महायुती सरकार जनतेला दुप्पट लाभ देत आहे याचे उदाहरण आहे महाराष्ट्राची माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा फायदा महिलांना होत आहे. मात्र कॉंग्रेस आणि आघाडीतील पक्ष या योजनेचा विरोध करत आहेत. त्यासाठी ते कोर्टातही गेले.आघाडीचे इरादे खतरनाक आहेत. हे तुमच्या भविष्यातील अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर महिलांनी ठरवले तर कॉंग्रेस आघाडीला दरवाज्यापर्यंतही पोहोचू देणार नाहीत असे ते म्हणाले.
भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, जय महाकाली या घोषणांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला मी नमस्कार करतो. स्वराज्यातील रायगड वासियांना माझा नमस्कार असे म्हणत प्रधानमंत्री मोदी यांनी आपलं भाषण सुरू केले. रायगडाच्या या भूमीला नमन करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. २०१३ मध्ये भाजपाने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवले होते तेव्हा मी रायगड किल्ल्यावर जावून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेतला होता. जसा एखादा भक्त आपल्या दैवतासमोर बसतो तसा मी बसलो होतो असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. ३१ ऑक्टोबर रोजी गुजरात इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता परेडच्या मुख्य कार्यक्रमात झालेल्या पोलीस परेडमध्ये रायगडाच्या किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती याचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. दुपारच्या वेळीही इथल्या मैदानावर उपस्थित असलेला हा जनसमुदाय पाहून केशरी रंग सर्वत्र पसरलेला दिसू येत आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात भाजपा महायुती आहे तर महाराष्ट्राची प्रगती असल्याचा आवाज आज सर्वत्र गुंजत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा विचार करून आमचे सरकार काम करत आहे. आम्ही पायाभूत सुविधा देत आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नशीब घडत आहे. रायगडात असलेले डेटा आणि एआयचे मोठे केंद्र बनवणार आहे. कळंबोलीमध्ये सेंटर पनवेलमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. पनवेल, रायगड हे क्षेत्र भविष्यातील प्रगतीचे केंद्र बनत आहे. रोजगार केंद्र बनत आहे. महाराष्ट्रात विकसित भारताचे केंद्र बनेल. आमचे सरकार कोस्टल भागात काम करत आहे. या सभेत प्रधानमंत्री मोदी यांची कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.
कॉंग्रेस आपले अस्तित्व वाचविण्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरली आहे. कॉंग्रेसची इच्छा आहे की दलित, आदिवासी, मागास यांचे संगठन होवू नये. जाती जातीत संघर्ष व्हावा. त्यामुळे आता दलित, आदिवासी, मागासवर्गीय एकत्र झाले नाहीत तर कॉंग्रेस आरक्षणाला संपवून टाकेल. एसटी, एससी, ओबीसी जाती एकमेकांशी लढवतील. आपल्याला यातून बाहेर पहायचं आहे. हम एक है तो सेफ है हा नारा देत आता हाच नारा यापुढे द्यायचा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही केवळ आमदार नव्हे तर महाराष्ट्राचं नशीब घडवणार आहात असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले. आमच्या सरकारने ४ करोड बेघर लोकांना पक्की घरे दिली आहेत. १२ करोड लोकांच्या घरी शौचालये दिली. ज्यामुळे महिलांना त्यांना सन्मान मिळाला. जलजीवन मिशन मुळे घरोघरी पाणी पुरवठा पोहचवत आहोत. आज जवळपास प्रत्येकाकडे बॅंक खाते आहे. ज्यामुळे लोकं यूपीआय पेमेंट करत आहेत. अशा विविध योजनांचा फायदा घेत गरीब पुढे जात आहेत. त्यासोबतच देशाला देखील पुढे नेत आहे. ज्याचा सर्वात जास्त फायदा वंचित समाजाला होत आहे. जी कामे गेल्या दहा वर्षांत झाली ती या पूर्वीही झाली असती मात्र कॉंग्रेसची इच्छा नव्हती. त्यामुळे कॉंग्रेसने योजनांना विरोध केला आहे. रायगड जिल्ह्यात १८ लाख लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. गरिबांच्या घरात यामुळे चूल पेटत आहे. गरिबांच्या घरात चूल पेटली तर त्याचा आनंद सर्वसामान्यपणे सर्वांनाच होत असतो मात्र कॉंग्रेस पक्षाला याचा आनंद होत नाही असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.








































































