Last Updated on 23 Mar 2025 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कासेगाव ग्रामपंचायतीकडून प्रतीक पाटील यांचा सत्कार
सांगली : कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपला जीव धोक्यात घालून केलेले काम समाज कधीही विसरू शकत नाही. आम्ही आपल्या या कामाबद्दल सदैव कृतज्ञ राहू,अशी भावना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांनी कासेगाव (ता.वाळवा) येथील पदयात्री स्मारकामधील समारंभात बोलताना व्यक्त केली. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत महिलांनी एकमेकींच्या हातात-हात घालत नारी शक्ती अधिक सशक्त करावी,असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रतीक पाटील यांचा कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुप्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून कासेगाव व परिसरातील १७ गावात कार्यरत २२५ आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जागतिक महिला दिनानिमित्त गृहोपयोगी भेट वस्तू व शाल देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देवराजदादा पाटील,सौ.सुप्रिया पाटील,कवियत्री प्रा.लता ऐवळे-कदम,माजी जि.प. सदस्या संगीता पाटील,माजी पं.स. सभापती शुभांगी पाटील,सुवर्णा जाधव, कासेगावच्या सरपंच कल्पना गावडे,वाटेगाव च्या सरपंच नंदाताई चौगुले,काळमवाडी सरपंच सविता सावंत,येवलेवाडीच्या सरपंच पुनम जगताप,केदारवाडीच्या सरपंच रत्नप्रभा माने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील,स्व.जनार्दन काका पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रतीक पाटील पुढे म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी महिलांना समाजात ताठ मानेने व स्वाभिमानाने जगता यावे,यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देताना महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली आहे. आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देत आहोत. भविष्यात महिलांच्या मधून यशस्वी उद्योजक घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
देवराज पाटील म्हणाले,आमच्या माता-भगिनींचे कामच एवढे मौल्यवान आहे की,त्यांचा सन्मान करण्यास केवळ ८ मार्च हा एक दिवस पुरेसा नाही. त्यांचा दररोज सन्मान केला तरी तो अपुरा पडू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवारसाहेब, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राज्या तील महिलांना ३३ टक्के आरक्षण दिल्याने आज महिला सार्वजनिक क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत आहेत. सांगली जिल्ह्यास माझी वसुंधरामध्ये विविध पुरस्कार मिळविण्यात महिलांचे योगदान मोठे आहे.
प्रा.लता ऐवळे म्हणाले,लोकनेते राजाराम बापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सातत्याने महिलांनाचा सन्मान करताना त्यांना विविध क्षेत्रात संधी दिली आहे. त्यांचा हा वारसा त्यांची तिसरी पिढीही पुढे नेत असल्याचे पाहून समाधान वाटते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितांनी महिला अतिशय प्रभावित आणि मंत्रमुग्ध झाल्या.
यावेळी माजी सरपंच नंदाताई पाटील, सुनंदा देशमुख,नंदाताई पाटील,शोभा नवाळे, छाया पाटील,तनुजा अत्तार,राणी माने, कल्पना देशमुख,सारिका गावडे,मंजुश्री माळी,दिपाली मिसाळ,जोत्स्ना बडेकर, संगिता जाधव,तसेच माजी सरपंच किरण पाटील,समाजभूषण सचिन पाटील,उपसरपंच सुजित पाटील यांच्यासह १७ गावातील आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कासेगावच्या सरपंच कल्पना गावडे यांनी आभार मानले. अमोल मिसाळ (सर) यांनी सूत्र संचालन केले.










































































