Last Updated on 13 Nov 2024 11:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । काँग्रेस आणि महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासनांवर खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाच विश्वास नाही. महाराष्ट्रात जाहीरनामा घोषित करण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी कर्नाटकातील आपल्या नेत्यांना पूर्ण होतील अशीच आश्वासने देण्याच्या कानपिचक्या दिल्या होत्या. भाजपने मात्र दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजपचे संकल्पपत्र सत्यात उतरविणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गँरंटी आहे, अशा शब्दात भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली.
अमित शाह यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईतील घाटकोपर येथे प्रचारसभेला संबोधित केले. राज्याच्या विविध भागात मी फिरतो आहे. महाराष्ट्राच्या भिंतीभितीवर, मोठ्या अक्षरात महायुतीचा विजय रेखाटल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, हे स्पष्ट दिसत असल्याचे शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भाजपचे संकल्पपत्र आणि त्यातील आश्वासने पूर्ण होणार ही काळ्या दगडावरची रेषा असते. दिलेली आश्वासने पूर्ण होणारच ही मोदींची गँरंटी आहे. भाजप सत्तेत आला व काश्मिरातील ३७० कलम घडविले. तेंव्हा विरोधक म्हणायचे देशात रक्ताचे पाट वाहतील. आज हे कलम हटून इतके वर्षे झाली पण साधे दगड उचलायची हिंमत कोणाची झाली नाही. आज राहुल गांधी यांची काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा एकदा ३७० कलम आणण्याची भाषा काश्मिरात करत आहेत. मात्र, राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी आता कोणी ३७० कलम आणू शकणार नाही. मोदी सरकारच्या काळातच अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले गेले. काशी विश्वनाथाचे काॅरिडोअर तयार झाले. आज सोमनाथ मंदिराला सुवर्ण झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीच्या मानबिंदूना प्रतिष्ठा मिळवून दिल्याचेही अमित शाह म्हणाले. महाविकास आघाडी दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण करू शकत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाच त्यांच्या आश्वासनांवर विश्वास नाही. आघाडी सरकारच्या काळात विकासकांना स्थगिती देण्याचेच काम झाले. महाविकास आघाडीवाले केवळ मौलानांना पंधरा हजारांचे मानधन देण्याचे काम करू शकतात.
धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याची उलेमांची मागणी मान्य करणारे पत्रच काँग्रेसच्या इथल्या अध्यक्षाने दिले आहे. मुस्लिमांना दहा टक्के आरक्षणाचे आश्वासन देणारी काँग्रेस ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणार आहे का? की दलित आणि आदिवासींच्या आरक्षणात मुस्लिमांना वाटेकरी बनविणार आहे , अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा ठाम विरोध असल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले. घाटकोपर येथील या सभेत अमित शाह यांनी घाटकोपर पुर्वचे उमेदवार पराग शाह, घाटकोपर पश्चिमचे राम कदम, मुलुंडचे मिहीर कोटेचा, विक्रोळीतून सुवर्णा करंजे, मानखुर्द शिवाजीनगर येथील सुरेश पाटील आणि भांडूप पश्चिम येथून अशोक पाटील या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.










































































