Last Updated on 18 Dec 2023 7:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर । केंद्रीय रस्ते निधी -सीआरएफ मधून महाराष्ट्रातील 91 रेल्वे उड्डाणपूल-आरओबीपैकी 31 आरओबीचे बांधकाम आपण ‘महारेल’ महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने चालु असलेल्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कंपनीला दिले आहे.त्यापैकी 24 पूल त्यांनी बांधून वाहतुकीसाठी तयार केले आहेत,अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) यांनी के.डी.के. कॅालेज जवळ,व्यंकटेश नगर,गोरा कुंभार चौक नंदनवन येथे या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक ठिकाणाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आले.आज भूमिपूजन करण्यात आलेले सर्व उड्डाणपुल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यक्षेत्रातील आहे.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल आ.चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे,विकास कुंभारे,अॅड. आशिष जायस्वाल,टेकचंद सावरकर यावेळी उपस्थित होते.
उद्घाटन झालेल्या 9 उडानपुलामध्ये नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वे स्टेशन,काटोल रेल्वे स्टेशन,चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशन,नाशिकातील खेरवाडी रेल्वे स्टेशन,जळगाव रेल्वे स्टेशन,सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशन,भिलवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणचे रेल्वे उड्डाणपूल तसेच ठाण्यातील तुर्भे उड्डाणपूल त्याचप्रमाणे मुंबई मधील मानखुर्द येथील उड्डाणपूल यांचा समावेश आहे.या बांधकामासाठी सुमारे 629 कोटी रुपये खर्च आला आहे.
तर भूमिपूजन झालेल्या नागपूर शहरातील 5 उड्डाणपुलामध्ये रेशीम बाग चौक ते केडीके कॉलेज चौक,चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक लाडपुरा,लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर बगडगंज,राजेंद्र नगर ते हसनबाग चौक खरबी त्याचप्रमाणे वर्धमान नगर ते निर्मल नगरी यांचा समावेश आहे.या 5 उडानपुलाच्या कामासाठी सुमारे 792 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याप्रसंगी नागपुरातील विविध विकास कार्याची माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की,पूर्व नागपुरात नवीन पारडी उड्डाण पुलामुळे अंतर कमी झाल्याने वाहतूकीचा वेळ वाचत आहे.
याप्रसंगी महारेल या उपक्रमाविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,ही कंपनी महाराष्ट्रामध्ये आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि व्यवस्थापकीय संचालक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने झपाट्याने काम पूर्ण केले.
आज लोकार्पित झालेले राज्यातील 9 उड्डाणपुल
- नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 559 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 742.20 मी. – किंमत रु. 65.55 कोटी
- नागपूर जिल्ह्यातील काटोल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 282 बी येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 610 मी. – किंमत रु. 57.77 कोटी
- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 27 येथील दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 553.63 मी. – किंमत रु. 46.14 कोटी
- नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 95 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 793 मी. – किंमत रु. 39.14 कोटी
- जळगाव जिल्ह्यातील जळगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 147 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 1005.62 मी. – किंमत रु. 53.91 कोटी
- सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 465 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 718.75 मी. – किंमत रु. 35.19 कोटी
- सांगली जिल्ह्यातील भिलवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 117 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 1020.30 मी. – किंमत रु. 88.78 कोटी
- ठाणे जिल्ह्यातील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील तुर्भे येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरण– प्रकल्पाची लांबी – 1732 मी. – किंमत रु. 155.78 कोटी
- मुंबईतील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील मानखुर्द येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरण – प्रकल्पाची लांबी – 835 मी. किंमत रु. 86.91 कोटी .
आज भूमीपूजन झालेले नागपुरातील 5 उड्डाणपुल
- रेशीमबाग चौक ते के. डी. के कॉलेज चौक आणि टेलिफोन एक्सचेंज ते भांडे प्लॉटपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपूल – प्रकल्पाची लांबी – 2310 मी. – किंमत रु. 251 कोटी
- मसुरकर मार्ग, लाडपुरा येथील चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौकपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 564 मी. – किंमत रु. 66 कोटी
- जुना भंडारा रोड, बागडगंज येथील लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर येथे दोन मार्गिका उड्डाणपुल प्रकल्पाची लांबी – 1351 मी. – किंमत रु. 135 कोटी
- मिडल रिंग रोड, खरबी येथील राजेंद्र नगर चौक ते हसनबाग चौक येथे दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 859 मी. – किंमत रु. 66 कोटी
- वर्धमान नगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप (शिवाजी चौक) ते निर्मल नगरी (उमरेड रोड) येथे तीन मार्गिका उड्डाणपुल – प्रकल्पाची लांबी – 2724 मी. – किंमत रु. 274 कोटी







































































