Last Updated on 12 Nov 2024 6:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपल्या राज्यातील लाखो युवकांच्या हाताला काम देणारे अनेक मोठ-मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? याचा विचार आपल्या राज्यातील जनता निश्चितच करत आहे. भाजपा महायुतीच्या सरकारने मोदी-शहा आणि गुजरातचे मांडलिकत्व पत्करल्याने महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप युवा नेते राजवर्धन जयंतराव पाटील (भैय्या) यांनी इस्लामपूर येथील सभेत बोलताना केला. आ.जयंतराव पाटील यांचा विजय निश्चित असून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर शहरातील मंत्री कॉलनी, बुरुड गल्ली,रामोशी गल्ली व शास्त्रीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर कोपरा सभेत ते बोलत होते. शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे,पै.भगवान पाटील,अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव,अँड.धैर्यशिल पाटील,अरुण कांबळे,सुरेंद्र पाटील,संदीप पाटील,पुष्पलता खरात,दिग्विजय पाटील,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे,अँड.आर.आर.पाटील,अँड. आकीब जमादार,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शकील सय्यद, उदय सरनोबत, आपचे गजानन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
राजवर्धन पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून इतिहास घडविला. मात्र भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडून त्यांना सुरतला नेले आणि मराठी माणसाने उभा केलेला पक्ष फोडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला. राज्यातील जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत हिसका दाखविला. ही दोन व्यक्तींमधील लढाई नसून दोन विचारामधील लढाई आहे. समोरच्या बाजूला गुजरात धार्जिण्य,पक्ष बदलू,गद्दार आहेत. तर आपल्या बाजूला विचार,तत्व,स्वाभिमानाचे,तसेच महाराष्ट्र व सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणारे नेते आहेत. शेवटी विजय सत्याच होतो.
शहाजी पाटील म्हणाले,आ.जयंत पाटील यांनी या शहरातील घरपट्टी कधीही वाढू दिली नाही. मात्र अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांनी या शहरातील घरपट्टी वाढविण्या चे पाप केले आहे.
पै.भगवान पाटील म्हणाले, जे विधान सभेला उमेदवार म्हणून उभा आहेत,त्यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात केलेले एक ठळक काम सांगावे.
शकील सय्यद म्हणाले, उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आ.जयंतराव पाटील यांच्यामध्ये आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून राज्याचे मुख्यमंत्री होण्यास आशिर्वाद द्या.
सौ.अरुणादेवी पाटील म्हणाल्या, आ. जयंत पाटील हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व आहे. त्यांनी तालुक्यात विकास कामां चा डोंगर उभा केला आहे. त्यांना तुम्ही ३५ वर्षात काय केले? हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अँड.चिमण डांगे, दादासाहेब पाटील,अँड.धैर्यशिल पाटील, गजानन पाटील,उदय सरनोबत,सुशांत कुऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, माजी नगरसेविका उषाताई बाणेकर,अनिल पावणे,गोपाळ नागे,प्रियांका साळुंखे,प्राचार्य दीपा देशपांडे,पिरअली पुणेकर,मालन वाकळे,राहुल नागे, रणजित तेवरे,संजय जाधव,रणजित गायकवाड,राजू सावकार, नाझीम खाटीक, सर्जेराव बोडरे,आयुब हवलदार,दत्ता फल्ले यांच्यासह त्या-त्या परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक, महिला-पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































