Last Updated on 18 Mar 2022 1:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा
सातारा येथे 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान होणार
सातारा ।
कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही.मात्र यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे.दरम्यान,या स्पर्धेच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. .
यावर्षीची 64 वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होईल. ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी 18 ते 20 एप्रिलदरम्यान भोसरी- पिंपरी चिंचवड येथील मारुती सावजी लांगडे कुस्ती हॉलमध्ये होईल.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक (कै.) मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झाली. तेथे हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते होते. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,गणेश कोहळे,हनुमंत गावडे,संभाजी वरुटे,दयानंद भक्त,सरचिटणीस प्रा.बाळासाहेब लांडगे,खजिनदार सुरेश पाटील,तांत्रिक सचिव बंकट यादव,विभागीय सचिव सुनील चौधरी,वामनराव गाते,भरत मेकाले,मुरलीधर टेकुलवार,संपत साळुंखे,शिवाजी धुमाळ,सुभाष घासे,सुभाष ढोणे,विनायक गाढवे,ललित लांडगे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा
दरम्यान,या स्पर्धेच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवास व्यवस्था, नाष्टा, जेवण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करुन पार्कींग व्यवस्था व अन्य इतर सोयी सुविधाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.











































































