Last Updated on 02 Jul 2023 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
मुंबई । राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेनंतर अखेर आज राष्ट्रवादी फुटली.यानुसार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राज्यात वर्षभरानंतर पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.अजित पवार यांनी शिदे,फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज सकाळी देवगिरी या बंगल्यावर बैठक बोलावली होती. याच बैठकीत मोठा निर्णय झाला. त्यानुसार, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दुपारी अडीच वाजचा राजभवनामध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला.राज्यपाल रमेश बैस यांनी पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांना शपथ दिली.
“मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे हेही राजभवनात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही राजभवनात दाखल झाले आहेत.अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांपैकी 9 जण मंत्रीपदाची शपथ घेतली.काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाली होती.
दरम्यान,संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा दर्शविली होती. विरोधी पक्ष नेते पद मला नको असल्याचे सांगितले. त्यानंतर आता अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा दिली. या निर्णयामुळे अजित पवार हे नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर आता पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा आहे.पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाटेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते.मात्र,आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे.अजित पवारांसह छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील,हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे,धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम,आदिती सुनील तटकरे,संजय बाबूराव बनसोडे,अनिल भाईदास पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
‘पक्ष आमच्या सोबतच’, अजित पवार यांचा दावा

‘पक्ष हा आमच्या सोबतच आहे’, असं नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही माझयाकडे आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार असं म्हणाले आहेत.ते म्हणाले, या संदर्भात अनेक दिवस चर्चा चालू होती. राजकीय परिस्थिती आहे.राज्याची परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार करता विकासाला महत्व दिले पाहिजे, असे सर्व सहकाऱ्यांचं मत झाले.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली 9 वर्षे जो कारभार सुरू आहे.ते देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असं प्रयत्न सुरू असताना त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं मत झाले.
पवारांचा पाठिंबा नाही
दरम्यान,अजित पवार यांच्या शपथविधीशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे शरद पवार यांच्याशी बोलणं झाले.या बंडाशी संबंध नाही.मी खंबीर आहे,असे शरद पवार यांनी राऊत यांना सांगितल्याचे राऊत यांनी ट्विट करून सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे हे नेते झाले मंत्री
अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री








शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या महिला मंत्री

दरम्यान,अजित पवार यांच्यानंतर खासदार दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे यांनीही शपथ घेतली.त्यानंतर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.अदिती तटकरे यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली.यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती.आता अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.












































































